माजी आमदार राजीव आवळे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार  - Former MLA Rajiv Awale will soon join the NCP | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार राजीव आवळे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

आपण जनसुराज्य शक्ती पक्षाचे निष्ठेने काम केले. पण गेल्या विधान सभेवेळी आपणास उमेदवारी मिळाली नाही. आपल्यावर अन्याय करण्यात आला.

इचलकरंजी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. त्यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. आपल्या या निर्णयाबाबत हातकणंगले विधानसभा मतदार संघातील सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रीया माजी आमदार राजीव आवळे यांनी आज (ता. 7 नोव्हेंबर) व्यक्त केली. 

जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी आमदार असलेले आवळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियातून रंगली होती. या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना प्रवेशाबाबतची भूमिका अधिकृतपणे जाहीर केली. यावेळी त्यांचे बंधू नगरसेवक अब्राहम आवळे उपस्थीत होते. 

आवळे म्हणाले, "आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात विनाअट प्रवेश करीत आहे. या निमित्ताने व्यापक काम करण्याची संधी मिळणार आहे. यापुढे पक्ष वाढीसाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. हातकणंगले विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या विचारांची अनेक माणसे आहेत. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र आणून पक्षाची मजबूत बांधणी केली जाणार आहे.'' 

"आपण जनसुराज्य शक्ती पक्षाचे निष्ठेने काम केले. पण गेल्या विधान सभेवेळी आपणास उमेदवारी मिळाली नाही. आपल्यावर अन्याय करण्यात आला. महामंडळावर संधी देतानाही आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांवर जनसुराज्य पक्षाच्या नेतृत्वाकडून अन्याय झाला. त्यामुळे या पक्षात राहून चीज होणार नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,'' असे स्पष्टीकरण माजी आमदार आवळे यांनी या वेळी दिले. 

माजी नगराध्यक्षांचा होणार प्रवेश 

माजी आमदार आवळे यांच्यासह पेठवडगावच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांचाही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांचा एक व्यापक मेळावा घेणार असून प्रांतिक उपाध्यक्षा प्रविता सालपे व सदस्य मदन कारंडे यांचे सहकार्य मिळत असल्याचे राजीव आवळे यांनी या वेळी सांगितले. 

कारंडे-जांभळे गटास एकत्र आणणार 

इचलकरंजीत राष्ट्रवादीमध्ये कारंडे व जांभळे अशा दोन भरभक्कम गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस विभागली आहे. या संदर्भात विचारल्यानंतर माजी आमदार राजीव आवळे यांनी या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख