उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केलेल्या डॉ. मिणचेकरांनी ‘गोकुळ’चे मैदानही मारले   - Former MLA Dr. Sujit Minchekar wins in Gokul election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केलेल्या डॉ. मिणचेकरांनी ‘गोकुळ’चे मैदानही मारले  

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

उमेदवारी मिळणार नाही, असे लक्षात येताच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच साकडे घातले.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघातील विरोधी पॅनेल असलेल्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडी पॅनेलमध्ये शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना फोन लावला होता. या निवडणुकीत माजी आमदार डॉ. मिणचेकर यांना लॉटरीच लागली. कारण, त्यांना उमेदवारी तर मिळालीच. पण, निवडणुकीत त्यांनी विजयश्रीही खेचून आणली. (Former MLA Dr. Sujit Minchekar wins in Gokul election)

गोकुळच्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गाठीभेटी व मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. विरोधी पॅनेलमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय मंडलिक, माजी आमदार विनय कोरे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे यांनी पॅनेलची बांधणी केली होती. 

उमेदवारी देताना या सर्वच नेत्यांचा आता कस लागला होता. उमेदवारीसाठी काहींच्या मुलाखतीही झाल्या होत्या. त्यावेळी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळो अगर न मिळो शेतकऱ्यांसाठी तुम्ही एकत्र राहणे गरजेचे आहे, असे आवाहन हे सर्व नेते करत होते. 

शिवसेनेचे उमेदवार म्हणून माजी आमदार मिणचेकर हे उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी ‘गोकुळ’ साठी उमेदवारीचा आग्रह धरला होता. पण, आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, असे लक्षात येताच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच साकडे घातले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच सतेज पाटील, मुश्रीफ आणि  यड्रावकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यानंतर विरोधी पॅनेलमध्ये डॉ. मिणचेकर यांचे नाव पक्के झाले. थेट मुख्यमंत्री ठाकरे यांनीच फोन केल्यामुळेच मिणचेकर यांना उमेदवारी मिळाली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी फोन केल्यामुळे डॉ. मिणचेकर यांनी उमेदवारी मिळविली. पण, अशी संधी पुन्हा मिळणार नाही, हे हेरून त्यांनी निवडणुकीची रणनीती आखली. त्यानुसार नियोजन करत त्यांनी गोकुळच्या निवडणुकीत विजयश्रीही खेचून आणली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख