शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ; सावकारांचा आम्ही बंदोबस्त करू! - Farmers, do not commit suicide; We will take care of the Moneylender! | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ; सावकारांचा आम्ही बंदोबस्त करू!

संपत मोरे : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

अजीज शेख या सावकाराच्या त्रासाला कंटाळून मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

पुणे : "सांगली जिल्ह्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. चार दिवसापूर्वी कदमवाडी येथील शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली , हे दुर्दैवी आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता त्रास देणाऱ्या सावकाराची माहिती आम्हाला कळवावी आम्ही सावकारांचा बंदोबस्त करू," असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे. 

खराडे म्हणाले, "जिल्ह्यात सावकारी फोफावली आहे. ही सावकारी पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे. अजीज शेख या सावकाराच्या त्रासाला कंटाळून मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अजीज शेख यांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने आत्महत्या केली, तरीही, शेख त्याच्यावर कारवाई व्हायला चार दिवस उलटले.  पोलिसाचे पाठबळ असल्याने कारवाईला उशीर लागला असल्याचे खराडे यांनी सांगितले. 
 
"सध्या कोरोना संकटामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. द्राक्ष बेदाणा भाजीपाला या सर्वाचे दर गडगडले आहेत.  शेती आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतीमालाची.विक्री सुरू आहे मात्र त्याला योग्य दर नाही. शेतीमाल विक्री करून घातलेला खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती आहे. कवडीमोल किमतीने शेतीमालाची विक्री सुरू आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या द्राक्ष बागवर कुऱ्हाड चालविली. अनेकांनी ट्रॅक्टरने भाजीपाला गाडून टाकला. 

 

अनेकांनी फुकट शेतीमाल दिला याचाच फायदा सावकार घेत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी हतबल न होता जाच आणि त्रास देणाऱ्या सावकाराची आम्हाला नावे कळवा. स्वाभिमानी शेतकरी संघटना संबधित सावकाराच्या बंदोबस्त नव्हे कडेलोट करू, पण शेतकऱ्यांनी मामुली सावकारासाठी अनमोल जीवन संपवू नका. आत्महत्या हा उपाय नाही. बॅंका, सावकार तगादा लावत असतील तर आम्ही संबधितांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहोत.

संकटाचा सामना निर्धाराने करा

जिल्ह्यातील सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांना आमचे आवाहन आहे, कोणत्याही परिस्थितीत हतबल न होता संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा, संकटाचा सामना निर्धाराने करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. यापूर्वीही महापूर, दुष्काळ अशी अनेक संकटे आपण पचविली आहेत. कोरोनचेही संकट दूर होईल. उद्याची पहाट सोनेरी असणार आहे, हा आशावाद बाळगा," असे खराडे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख