संजयकाकांनी ‘दगा होणार नाही’ असा शब्द देताच फडणवीस म्हणाले ‘तयारीला लागा...’

गृहपाठ पक्का करा
Fadnavis ready to change Sangli Zilla Parishad president and office bearers
Fadnavis ready to change Sangli Zilla Parishad president and office bearers

सांगली : सांगली महापालिकेतील बहुमतातील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षा ताकही फूंकन पित आहे. जिल्हा परिषदेच्या नाराज सदस्यांनी खासदार संजय पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत अध्यक्ष आणि पदाधिकारी बदलाची मागणी केली. तसेच, महापालिकेप्रमाणे झेडपीत ‘दगाफटका होणार नाही,’ असा शब्द संजयकाकांनी फडणवीस यांना दिला. त्यानंतर फडणवीस यांनी  ‘तुम्ही तयारीला लागा, आकडे जमवा, मी खाली निरोप देतो,’ असे आश्वासन नाराज गटाला दिले. (Fadnavis ready to change Sangli Zilla Parishad president and office bearers)

देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील घरी श्री गणरायाचे स्वागत करण्याच्या वेळीच खासदार पाटील आणि नाराज गट तेथे हजर होता. फडणवीसांकडे गणरायाची प्रतिष्ठापना करताना त्यांनी जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या विसर्जनाचा डाव टाकला. या मुद्यावर खासदार पाटील यांच्यासह नाराज गटाने त्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या आधी पंढरपूर येथे कोअर कमिटीसोबत चर्चा झाली होती.

दीड वर्षीपूर्वी प्राजक्ता कोरे यांना अध्यक्षपदी नियुक्त करताना ती निवड सव्वा वर्षासाठी असेल, असे ठरले होते. त्यावेळी सरिता कोरबू इच्छुक होत्या. त्या गटाची समजूत काढण्यात आली होती. आता दीड वर्षे सरली. निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे, त्यामुळे बदलासाठी चलबिचल सुरू झाली आहे. नाराज गटाने गणपती उत्सवापर्यंत बदलाचा निर्णय झाला नाही; तर अविश्‍वास ठराव दाखल करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे खासदार पाटील यांनी या गटासोबत मुंबई गाठली आणि पुन्हा एकदा त्या विषयाला तोंड फोडले.

दरम्यान, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी बदलास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शवली आहे. खासदार संजय पाटील आणि बदलासाठी नाराज झालेल्या सदस्यांच्या गटाने मुंबईत त्यांची भेट घेतली. बदल करायला हरकत नाही. मात्र, गृहपाठ पक्का करा, असा सूचक सशर्त होकार फडणवीस यांनी दिला आहे. आता त्यांच्याकडून अधिकृत निरोप आल्यानंतर येथे हालचाली गतिमान होतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषदेतील बलाबल पाहता भाजप भलतेच सावध आहे.

जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता शिवसेना, रयत, स्वाभिमानी अशा टेकूवर आहे. राज्यातील सत्तेचे गणित वेगळे आहे. भाजप राज्यात एकटा आहे. महापालिकेत महापौर निवडीवेळी मोठा खेळ झाला आणि हातची सत्ता गेली. जिल्हा परिषदेत तसे व्हायला नको, अशी भीती भाजपला आहे. परंतु, खासदार संजय पाटील यांनी पक्षाला तसा विश्‍वास दिला आहे. फडणवीस यांनाही त्यांनी ‘दगा होणार नाही’, अशी खात्री दिली आहे. त्यामुळे ‘तुम्ही तयारीला लागा, आकडे जमवा, मी खाली निरोप देतो’, असे फडणवीस यांनी आश्‍वस्त केल्याने नाराज गट मोठ्या अपेक्षेने परतला आहे. त्यांना आता वरून आदेश देण्याची प्रतीक्षा आहे. खासदार पाटील यांच्यासोबत माजी सभापती अरुण राजमाने, सुरेंद्र वाळवेकर, अरुण बालटे, मुंडगणूर, डॉ. अनिल कोरबू आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com