माजी आमदार रमेश कदम पुन्हा राष्ट्रवादीत : शेकाप, काँग्रेस, भाजपनंतर पुन्हा स्वगृही

अंतर्गत राजकारणामुळे ते काँग्रेसमध्येही अस्वस्थ होते. ते कोणता पक्ष निवडतील याची सर्वांनाच उत्सुकताहोती.
ramesh-kadam-ff.jpg
ramesh-kadam-ff.jpg

चिपळूण : माजी आमदार रमेश कदम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कदमांचा राष्ट्रवादीतून शेकाप, काँग्रेस, भाजप नंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे. 

महाराष्ट्रात 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून रमेश कदमही राष्ट्रवादीत सामील झाले. माजी खासदार कै. गोविंदराव निकम, राजाभाऊ लिमये यांच्यासह रमेश कदमांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले. ते उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य होते. 1999 आणि 2009 च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. 2004 च्या विधानसभा निवडणूकीत ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर चिपळूणमधून निवडून आले. मात्र 2005 मध्ये माजी मंत्री भास्कर जाधव राष्ट्रवादीत आल्यानंतर पक्षाने कदमांना डावळून पक्षाची मोठी पदे भास्कर जाधवांना दिली. त्यामुळे रमेश कदमांची कोंडी झाली होती.

2014 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी शेकापच्या चिन्ह्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. शेकापमधून बाहेर पडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र चिपळूण पालिकेतील भाजपचे लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील पदाधिकारी कदमांना विश्‍वासात घेत नाहीत त्यामुळे कदम अस्वस्थ होते. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळवले. मात्र अंतर्गत राजकारणामुळे ते काँग्रेसमध्येही अस्वस्थ होते. ते कोणता पक्ष निवडतील याची सर्वांनाच उत्सुकता होती.

शिवसेनेतील अनेक नेते रमेश कदमांच्या जवळचे आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे संबंध मधुर आहेत. मात्र कदमांकडे असलेले कार्यकर्ते आणि मतदार पाहता त्यांना राष्ट्रवादीत काम करणे सोपे होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीदरम्यान ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले होते. आज त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी खासदार सुनील तटकरे, चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, दापोलीचे माजी आमदार संजय कदम, प्रदेश युवकचे राकेश चाळके, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष योगेश शिर्के, मंडणगड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश शिगवण आदी उपस्थित होते. 

``मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती. पवार साहेबांना नाही. मी 1974 पासून त्यांच्याबरोबर आहे. ज्यांना पक्षाने सर्वकाही दिले त्यांनी अडचणीच्या काळात पक्ष सोडला. चिपळूणमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतली. पक्षाला दिलेला शब्द पूर्ण केला आणि सन्मानाने पुन्हा पक्षात स्वगृही परतलो. रत्नागिरी जिल्ह्यात हा पक्षच मी स्थापन केला आहे. त्यामुळे नेते देतील ती जबाबदारी पूर्ण करेन, असे कदम यांनी पक्ष प्रवेशावेळी सांगितले.  

पक्ष बळकट करण्यासाठी आपले चौफेर प्रयत्न सुरू आहेत. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्यांनीही घरवापसीची इच्छा प्रकट केलीय. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे लोक पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मत जयंत पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून रमेश कदम यांचे पक्षाला पाठबळ लाभले. काही कारणांमुळे मधल्या काळात ते वेगळे झाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात आता पक्ष मजबुतीसाठी त्यांच्यासह पुन्हा जोमाने कामास सुरवात करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी या वेळी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com