इचलकरंजीसाठीची सुळकुड पाणी योजना रद्द होईपर्यंत लढा

शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन श्री. घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले
 discussion between samrjit ghatge and farmers about sulkud scheme
discussion between samrjit ghatge and farmers about sulkud scheme

कोल्हापूर : इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित सुळकुड पाणी योजनेला गट-तट बाजूला ठेवून सहा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी ही योजना रद्द होईपर्यंत नेटाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. ही योजना रद्द करण्यासाठी पाठिंबा व पुढाकार घेण्यासाठी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांना या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे साकडे घातले. शिरोळ, हातकणंगले, करवीर ,राधानगरी, भुदरगड व कागल या सहा तालुक्‍यातील शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन श्री. घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी घोसरवाडचे नंदकुमार नाईक म्हणाले,"काळम्मावाडी धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. आम्हाला अजून पाणी पुरत नाही. तरीही हे पंचगंगा प्रदुषित करून दूध गंगेतील पाणी मागत आहेत. ते आम्ही कदापिही देणार नाही. वारणे वरून योजना का झाली नाही? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे.' दत्तवाडचे माजी उपसरपंच राजगोंडा पाटील म्हणाले,"शिरोळ तालुक्‍यातील नऊ गावांच्या पिण्याच्या व पाच गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही.' दिंडनेर्लीचे विलास पाटील म्हणाले, वारणेच्या शेतकऱ्यांचा विरोध बघून दूधगंगेवर ही योजना रेटण्याचा प्रयत्न हाणून पाडू या.' निगवे खालसा (ता. करवीर) येथील विलास कांजर म्हणाले,"एका जाणकार मंत्र्याने लोकभावनेचा विचार न करता आम्हा लाभार्थ्यांवर ही योजना लादण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला ठामपणे विरोध करूया.'

यावेळी सावर्डे खुर्द (ता.कागल) आनंदराव पाटील, कसबा सांगाव (ता. कागल) चे विक्रमसिंह माने, बापुसो शेटे, आनंदा डाफळे एम डी कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील यांनी केले अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले.
 
यावेळी नागाव तालुका करवीर येथील रंगराव तोरसकर म्हणाले, पाटबंधारे खात्याचे अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पाण्याबाबत दिशाभूल करणारी आकडेवारी व अहवाल शासनास सादर करण्याची शक्‍यता आहे. दूधगंगा -वेदगंगा काठावरील शेतकऱ्यांच्या लोकभावना जाणून घेऊन त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा. अन्यथा त्यांच्या घरावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढन्यात येईल असा इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com