रथातून मिरवणूक अन्‌ जेसीबीतून गुलाल उधळण उपसभापतींच्या अंगलट - Crime against 16 people including Kagal's deputy speaker Manisha Sawant | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

रथातून मिरवणूक अन्‌ जेसीबीतून गुलाल उधळण उपसभापतींच्या अंगलट

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

दोन्ही उमेदवारांना ‘मिरवणुक काढू नये' अशी नोटीस बजावण्यात आली होती.

कागल (जि. कोल्हापूर) : कागल पंचायत समितीच्या उपसभापतिपदी बानगे (ता. कागल) मनीषा संग्राम सावंत यांची निवड झाली. त्या निवडीनंतर त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावात रथातून मिरवणूक काढत जेसीबीमधून गुलालाची उधळण केली. वेगळ्या पद्धतीने जल्लोष साजरा करण्याचा प्रकार नूतन उपसभापती व त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच महागात पडला आहे. (Crime against 16 people including Kagal's deputy speaker Manisha Sawant)

या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा कागल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार नूतन उपसभापती मनीषा संग्राम सावंत, बानगे गावचे उपसरपंच लंबे, जेसीबी मालक नेताजी पाटील, फोटोग्राफर आदी सोळा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी स्वतः दिली आहे.

हेही वाचा : काँग्रेस आमदाराचे पुत्र झेडपी अध्यक्ष होताच भाजपच्या गोटात पसरला आनंद!

कागल समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड ता. ९ जुलै रोजी पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते रमेश तोडकर (लिंगनूर दुमाला) यांची सभापतिपदी, तर संजय घाटगे गटाच्या मनीषा सावंत (बानगे) यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर निवडून आलेल्या दोन्ही उमेदवारांना ‘मिरवणुक काढू नये' अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्याचे उल्लघंन उपसभापती मनीषा सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. आदेशाचा भंग करुन बाणगे गावात रथामधून काढलेल्या मिरवणुकीमध्ये जेसीबीमधून गुलालाची उधळण करण्यात आली.

मिरवणुकीचे फोटो व व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. या प्रकरणी कागल पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचा रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन, महाराष्ट्र कोव्हीड- 19 उपाय योजनांचे उल्लंघन व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपसभापती श्रीमती मनीषा संग्राम सांवत, संग्राम सावंत, रमेश सावंत, बानगे गावचे उपसरपंच लंबे, अमोल सावंत, सुनिल बोंगार्डे, सुरेश मारुती गुरव, सुशांत शिवाजी घेवडे, सुरज नलवडे, अशोक निवृत्ती पाटील, दत्ता सावंत, मदन शामराव पाटील, दत्तात्रय लंबे, फोटोग्राफर विनायक पाटील, जेसीबी मालक नेताजी पाटील, धनाजी पाटील लांबडे (सर्वजण रा.बाणगे) अशा १६ जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख