विश्वजित कदमांचे कडेगाववर वर्चस्व कायम : नगराध्यक्षपदी संगीता जाधव बिनविरोध

भाजपला सात जागांवर समाधान मानावे लागले होते.
Congress' Sangeeta Jadhav unopposed as Kadegaon mayor
Congress' Sangeeta Jadhav unopposed as Kadegaon mayor

कडेगाव (जि. सांगली) : कडेगाव  (Kadegaon) नगरपंचायतीच्या नगराध्यक्षापदी काँग्रेसच्या (Congress) संगीता जाधव, तर उपनगराध्यक्षपदी सागर सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी, गुलालाची उधळण व फटक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.  

कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत १७ पैकी १० जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता, तर भाजपला सात जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आकांक्षा जाधव यांना, तर उपनगराध्यक्षपदी साजिद पाटील यांना संधी मिळाली होती. तर अडीच वर्षांनंतर दुसऱ्या टर्ममध्ये काँग्रेसच्या नीता देसाई यांची नगराध्यक्षपदी, तर राजू जाधव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.

नगराध्यक्षा नीता देसाई व उपनगराध्यक्ष राजू जाधव यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर नगराध्यक्षापदी संगीता राऊत, तर उपनगराध्यक्षपदी दिनकर जाधव यांची निवड झाली. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. तर जिल्हाधिकारी यांनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. 

नगराध्यक्षपदासाठी संगीता जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. तर नगरपंचायत कार्यालयात आज पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी गणेश मरकड यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड पार पडली. यावेळी नगराध्यक्षपदासाठी संगीता जाधव व उपनगराध्यक्षपदासाठी सागर सूर्यवंशी यांचे प्रत्येकी एक अर्ज आला. त्यामुळे संगीता जाधव यांची नगराध्यक्षपदी, तर सागर सूर्यवंशी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर नूतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांनी सोनहिरा कारखाना कार्यस्थळावरील डॉ. पतंगराव कदम यांच्या समाधिस्थळी जावून अभिवादन केले.
 
हेही वाचा : रावसाहेब...आज तुम्हाला शब्द देतो; मी तुमच्यासोबत आहे!

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ, दीपक भोसले, विजय शिंदे, माजी नगराध्यक्षा संगीता राऊत, माजी उपनगराध्यक्ष दिनकर जाधव, नगरसेवक राजू जाधव, नितीन शिंदे, सुनील पवार, साजिद पाटील, नगरसेविका, रिजवाना मुल्ला, आकांक्षा जाधव, मुख्याधिकारी कपिल जगताप, राजेंद्र राऊत यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.
 
कडेगावचा चेहरामोहरा बदलू

आमदार मोहनराव कदम, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना बरोबर घेवून कोणताही भेदभाव न करता पारदर्शक कारभार केला जाईल. शहरात विविध विकास कामे राबवून चौफेर विकास साधत कडेगावचा चेहरा मोहरा बदलू, अशी ग्वाही नूतन नगराध्यक्षा संगीता जाधव व उपनगराध्यक्ष सागर सूर्यवंशी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com