भाजपतील वाढत्या इच्छुकांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची स्वप्ने  - Congress-NCP dreams of power in Sangli | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपतील वाढत्या इच्छुकांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची स्वप्ने 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

सर्वात कळीचा मुद्दा महापौर कोण होणार, हाच असेल.

सांगली : सांगली महापालिकेत कॉंग्रेसलाही आता सत्ता ताब्यात घेण्याचे वेध लागले आहेत. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी महापालिकेत सत्ताबदल झाला पाहिजे, असे मत मांडत त्याचे संकेत दिले आहेत. 

आगामी महापौर खुल्या प्रवर्गातून असल्याने सत्ताधारी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेच्या मनीषा आधीच उघड झाल्या आहेत. आता त्यांच्या प्रयत्नांना कॉंग्रेसची पूर्ण साथ मिळते का? हे लवकरच स्पष्ट होईल. महानगरपालिकेत भाजपचे कमळ चिन्हावर 41 आणि पाठिंबा दिलेल्या अपक्षांचे दोन असे 43 इतके बळ आहे. 

कॉंग्रेसचे सध्याचे 19 आणि राष्ट्रवादीचे 15 इतके नगरसेवकांचे बळ महापालिकेत आहे. सत्ताबदलासाठी दोन्ही कॉंग्रेस एकत्र येणे आणि त्याला भाजपमधील फुटीर नगरसेवक आणि बंडखोरांची साथ हवी. गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या सभापती निवडीवेळी कॉंग्रेसच्या मंगेश चव्हाण यांना पुढे करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ताबदलाची तयारी केली होती. मात्र, कॉंग्रेसमधून स्पष्ट संकेत मिळाले नाहीत आणि भाजपचे सहयोगी सदस्य गजानन मगदुम यांनी ऐनवेळी मागे पाय ओढल्याने भाजपच्या पांडुरंग कोरे यांचा बिनविरोध सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला. 

कोरे यांच्या निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ब्रॅन्डेड भाजपचाच महापौर असेल, असे सांगत दोन्ही कॉंग्रेस आणि भाजपमधील सुप्त बंडखोरांनाही थेट आव्हान दिले आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये महापौर निवड असेल. घोडे मैदान अजूनही दूर असले तरी त्यासाठी दोन्ही कॉंग्रेसबरोबरच भाजपमधील इच्छुकांच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. 

सर्वात कळीचा मुद्दा महापौर कोण होणार, हाच असेल. पक्षाचा व्हिप डावलून भाजपमधून कोण बंडखोरी करणार...महापालिकेत सत्ता ताब्यात घेतली तर त्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला नियंत्रणात ठेवता येईल का? असे काही प्रश्‍न आहेत. मात्र, सत्ताबदलासाठी दोन्ही कॉंग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत, हे नक्की. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख