विश्‍वजित कदमांचा जयंत पाटलांना टोला : 'कोणी काहीही करा; सांगली कॉंग्रेसचाच बालेकिल्ला'  - congress minister Vishwajit Kadam criticizes Ncp state prisedent Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

विश्‍वजित कदमांचा जयंत पाटलांना टोला : 'कोणी काहीही करा; सांगली कॉंग्रेसचाच बालेकिल्ला' 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

मी, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील आम्ही सारे एकच आहेत.

सांगली : "सांगली जिल्ह्यात कोणी काहीही वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला, तरी कॉंग्रेसवर काही फरक पडणार नाही. आम्ही सारे एक आहोत आणि एकजुटीने एकत्र राहू. सांगली जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे पुन्हा सिद्ध करून दाखवू,' असा सूचक इशारा कॉंग्रेस नेते, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अप्रत्यक्षरित्या दिला. 

केंद्र सरकारच्या कृषि विधेयकाच्या विरोधात कॉंग्रेसने ट्रॅक्‍टर रॅली काढली होती. एसटी स्थानकापासून ते नेमिनाथनगरपर्यंत निघालेल्या रॅलीनंतर सभा झाली. त्या वेळी विश्‍वजीत कदम यांनी टोलेबाजी करत जिल्ह्यातील कॉंग्रेस एकसंघ असल्याची जाहीर ग्वाही भाषणातून दिली. त्यांनी दिलेला इशारा नेमका कोणाला होता, याची चर्चा होत आहे.

जिल्ह्यात अलिकडे झालेल्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या काही नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणावर कॉंग्रेसने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. 

विश्‍वजीत कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उद्देशून ""आपला वैचारिक विरोधक कोण आहे, हे लक्षात घेऊन फोडाफोडी करा', असे आवाहन केले होते. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार मोहनराव कदम यांनीही राष्ट्रवादीच्या प्रवेश सत्रावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. 

त्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री डॉ. कदम यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ते म्हणाले, "सांगली जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो पुन्हा मजबूत करू आणि जिंकून दाखवू. मी, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील आम्ही सारे एकच आहेत.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख