चंद्रकांतदादांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला : मुश्रीफांचा खळबळजनक आरोप 

चंद्रकांतदादा यांनी 'झालेल्या गोष्टी चुकून झाल्या, गैरसमजातून झाल्या, राजकीय हेतून झाल्या, माहिती न घेता बोलल्याने झाल्या' हे एकदा कबूल करावे. याबाबत त्यांनी पुन्हा एकदा फेरविचार विचार करावा. त्यातूनही जर त्यांनी या चुका मान्य केल्या नाहीतर आपणाला बदनामीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा ना.मुश्रीफ यांनी यावेळी दिला.
hasan mushrif.
hasan mushrif.

कोल्हापूर : जिल्हा बॅंक, राज्य बॅंकेवर कलम 88 ची कारवाई करत मला सहकारातून उठवण्याचा प्रयत्न केला. तसेच इन्कमटॅक्‍स, ईडीची कारवाई करुन मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्याचा आरोप, राज्याचे ग्रामिवकास मंत्री व जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला.

ते जिल्हा बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री.पाटील यांनी आपल्यावर केलेले चुकीचे आरोप मान्य करावेत अन्यथा त्यांच्यावर बदनामाची फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असेही ना.मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 

मुश्रीफ म्हणाले, भाजप सत्तेच्या काळात श्री.चंद्रकांतदादांनी खूप त्रास दिला. सहकार आणि राजकारणातून उठवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. जिल्हा बॅंकेची कलम 88 ची चौकशी लावून या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक साखर संचालकांवर त्यांनी यासाठी दबावही आणला. विरोधक म्हणून आयुष्यातून उठवण्यासाठी पुर्वलक्ष्यी प्रभावाने अध्यादेश आणून कायदा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ईडी, इन्कमॅटक्‍सच्या माध्यमातून कारवाई केली. हे कमी होते की काय म्हणून आमच्या ग्रामिवकास विभागाने अर्सेनिक अल्बम हे औषध राज्यातील 5 कोटी जनतेला देण्याचा निर्णय घेतला. यामध्यही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. वास्तविक औषध खरेदीचा अधिकार हा जिल्ह्याला देण्यात आला आहे, असे असताना चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. 

अर्सेनिक अल्बमच्या आरोपानंतर मी त्यांना माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यांनी माफी न मागितल्याने बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. यानंतर सतत पत्रकबाजी झाली. या सर्व प्रकारावर मी आता पडदा टाकणार आहे. चंद्रकांतदादा यांनी 'झालेल्या गोष्टी चुकून झाल्या, गैरसमजातून झाल्या, राजकीय हेतून झाल्या, माहिती न घेता बोलल्याने झाल्या' हे एकदा कबूल करावे. याबाबत त्यांनी पुन्हा एकदा फेरविचार विचार करावा. त्यातूनही जर त्यांनी या चुका मान्य केल्या नाहीतर आपणाला बदनामीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा ना.मुश्रीफ यांनी यावेळी दिला. 

चंद्रकांतदादांनी मला व सतेज पाटील यांना पत्र पाठवून त्यांचेवर न केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन कोरोना काळामध्ये आपण किती मदत केली (प्रचंड माया असल्यामुळे), त्यांची उदाहरणे देऊन आम्हांस आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले होते. त्यावर मी उत्तर देताना श्री चंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे कसे आहेत, याचे सोदाहरण स्पष्टीकरण दिले होते. एक चेहरा परोपकारी, प्रांजळ, लोकांना प्रामाणिक आहे असा भास व्हावा व दुसरा चेहरा सत्ता संपत्तीच्या जोरावर आपल्या विरोधकास जीवनातून उठवण्याचा! वरील सर्व गोष्टीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  दोन वकीलांची मॉनिटरिंग करण्यासाठी नियुक्ती व वरील खटल्यासाठी देशातील व राज्यातील सिनियर वकिलांची उभी केलेली फौज फक्त हसन मुश्रीफ यांना आयुष्यातून उठवण्यासाठीच. तेच मला सत्तेचा उपयोग करून रक्तबंबाळ करून 'आ बैल मुझे मार', असे विधान करत चोराच्याच उलट्या बोंबा याचाच प्रत्यय देत आहेत, असा वार त्यांनी केला.

मला निष्ठा दाखवण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागते, खरोखर अशी हास्यास्पद विधाने तरी करू नका. कारण कितीही संकटे आली, मला भाजपमध्ये घेऊन मंत्री केले की, प्रचंड माया दिली त्यावेळीही पवार एके पवार म्हणणारा, मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे. सत्ता असली काय आणि नसली काय. मला फरक पडत नाही. ज्यावेळी परमेश्वराच्या कृपेने व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सत्ता येते, त्यावेळी फक्त लोककल्याण व विकास हे दोनच माझ्या डोळ्यासमोर असतात, असे मुश्रीफ म्हणाले.

सत्तेचा वापर करून शत्रूचेही भले करण्याचा माझा प्रयत्न असतो. लोक वैचारिक विरोधक असतात, ते आपले शत्रू असत नाहीत. श्री पाटील यांनी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये कंपन्यांचे संचालक असल्याचे लपवल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला करावा. अशा आशयाच्या बातम्या आल्या आहेत. त्याबद्दल मला कोणतेही देणे घेणे नाही. असे व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा त्यांच्या वाळल्या पालापाचोळ्यावरसुद्धा मी पाय ठेवत नाही. ही माझी संस्कृती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हातात हात घालून काम करुया 
आज आपल्यावर कोरोनाचे संकट आले आहे. मुबंईएवढी रुग्णसंख्या आपल्याकडे सापडत आहे. अशा काळात टीकटिप्पणी, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा हातात हात घालून काम करुया,असे आवाहनही ना.मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com