पुणे पदवीधरमध्ये भाजपचे नाक कापण्याचे स्वप्न विरोधक पाहत आहेत : चंद्रकांतदादा  - Chandrakant Patil criticizes Mahavikas Aghadi government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पुणे पदवीधरमध्ये भाजपचे नाक कापण्याचे स्वप्न विरोधक पाहत आहेत : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

महाविकास आघाडीची दडपशाही, अनागोंदी व खोट्या आश्‍वासनांना राज्यातील जनता वैतागली आहे. ती मतदानाची वाट पहात दबा धरून बसली आहे.

सातारा : महाविकास आघाडीची दडपशाही, अनागोंदी व खोट्या आश्‍वासनांना राज्यातील जनता वैतागली आहे. ती मतदानाची वाट पहात दबा धरून बसली आहे. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीतील सर्वच्या सर्व जागांसाठी भारतीय जनता पक्षाला मतदान करून आम्ही नाराज असल्याचा संदेश जनता राज्यकर्त्यांना देईल. त्यामुळे या निवडणुकांचा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज (ता. 13 नोव्हेंबर) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, दिवाळी आली तरी शेतकऱ्यांना एक पै मिळालेले नाही. पैसे नसल्याने आता शेतकऱ्यांना लाडू व इतर गोडधोड करता येत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी किसान आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात झुणका भाकर खाण्याचे आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे. ही आंदोलनेही दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राज्यात लोकशाही आहे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मराठा समाजाला भाजप सरकारने आरक्षण दिले. परंतु, ते टिकवण्याचे काम आघाडी सरकारला जमले नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळही बरखास्त केले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत. कोणत्याच पातळीवर काही काम होत नाही. सरकारमध्ये कोणाचा कोणाला पायपूस नाही. सरकारच्या कारभारावर जनता नाराज आहे. ती नाराजी विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करून नक्कीच व्यक्‍त होईल. त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल. राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल, असेही ते म्हणाले. 

भाजप सरकारच्या कालावधीत पदवीधर बेरोजगारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्ज वाटप, औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच कायम विनाअनुदानित शाळांच्या समोरील कायम हा शब्द काढून टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची प्रक्रिया राबविली. प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केली. शिक्षण संस्थांना 20 टक्के अनुदान मंजूर केली. त्यामुळे पदवीधर व शिक्षक दोन्ही पक्षाच्या बाजूने राहतील. पुणे पदवीधर मतदार संघासाठी संग्राम देशमुख तर, शिक्षक मतदार संघासाठी जितेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सदस्य सुवर्णा पाटील, ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, प्रदेश सदस्य अमित कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. भरत पाटील आदींची उपस्थिती होती. शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी या मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. 

ही निडणूक प्रतिष्ठेची 

चंद्रकांत पाटलांचा मतदार संघ म्हणून पदवीधरच्या या मतदार संघाकडे पाहिले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपला पराभूत करून नाक कापण्याची स्वप्ने विरोधक पाहत आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी मेळाव्यात केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख