सुश्मिता पाटील, दीपक पाटलांच्या पराभवाने ‘गोकुळ’मध्ये चंदगडची पाटी कोरी - Chandgad is not represented in 'Gokul' due to the defeat of Sushmita Patil and Deepak Patil | Politics Marathi News - Sarkarnama

सुश्मिता पाटील, दीपक पाटलांच्या पराभवाने ‘गोकुळ’मध्ये चंदगडची पाटी कोरी

सुनील कोंडुसकर 
गुरुवार, 6 मे 2021

सुरुवातीची सुमारे वीस वर्ष संघावर या तालुक्याला प्रतिनिधित्व नव्हते.

चंदगड : कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांप्रमाणेच चंदगड (Chandgad) तालुक्यातील जनतेचेही गोकुळ (Gokul) दूध संघाच्या मतमोजणीकडे डोळे लागले होते. कारण, सत्तारुढ महाडिक-पाटील गटाकडून विद्यमान संचालक दीपक पाटील (Deepak Patil) आणि विरोधी पाटील-मुश्रीफ गटाकडून आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता पाटील (Sushmita Patil) या गोकुळच्या रिंगणात होत्या. पण दोघांचाही या निवडणुकीत पराभव झाल्याने गोकुळमध्ये चंदगड तालुक्याची पाटी कोरीच राहिली. संघामध्ये सत्तांतर होऊनसुद्धा तालुक्यात मात्र ना गुलाल उधळला गेला, ना फटाके वाजले. (Chandgad is not represented in 'Gokul' due to the defeat of Sushmita Patil and Deepak Patil)

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात दोन्ही स्वीकृत संचालक पदे चंदगड तालुक्याला द्यावीत, अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे यांनी जिल्हा दूध संघाकडे ही मागणी केली आहे.

पहिल्या टप्प्यात राखीव जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली, त्यावेळी स्थानिक उमेदवार सुष्मिता राजेश पाटील यांच्या मतांकडे सर्वांच्या नजरा होत्या. अंतिम टप्प्यात त्या मताधिक्यामध्ये मागे पडल्या. त्यांच्या पराभवामुळे आमदार राजेश पाटील गटात नाराजीचे वातावरण पसरले आहे. सर्वसाधारण गटामध्ये सत्तारूढ गटाकडून विद्यमान संचालक दीपक पाटील हे तरी बाजी मारतील अशा अपेक्षा होती, परंतु त्यांचाही पराभव झाला. सत्तारूढ आणि विरोधी दोन्ही गटातून तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवारच नसल्याने संपूर्ण तालुक्यात नाराजीचे वातावरण आहे. 

हेही वाचा : गोकुळमध्ये सतेज पाटील कोणाला अध्यक्ष करणार, या दोघांची नावे चर्चेत

गोकुळ दूध संघामध्ये सर्वाधिक दूध पुरवठा करणारा तालुका म्हणून चंदगडची ओळख आहे. दररोज सुमारे 90 हजार लिटर दूध संकलन या विभागातून केले जाते. नैसर्गिक अनुकूलतेमुळे येथील चाऱ्याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर आहे. दुधाचा स्निग्धांशसुद्धा जास्त आहे. विशेष म्हणजे सुमारे 60 टक्के दूध म्हशीचे, तर 40 टक्के दूध गाईचे आहे. त्यामुळे गोकुळचा ब्रँड तयार होण्यास चंदगड तालुक्याचे मोठे योगदान आहे. 

सुरुवातीची सुमारे वीस वर्ष संघावर या तालुक्याला प्रतिनिधित्व नव्हते. त्यानंतर मारुती कांबळे, महादेव कांबळे व नामदेव कांबळे यांच्या रूपाने सलग प्रतिनिधीत्व मिळाले. विद्यमान संचालक दीपक पाटील सुमारे पंधरा वर्ष संचालक राहिले आहेत. या तालुक्याला दोन संचालक पदे असावीत, अशी मागणी होती. गतवेळच्या निवडणुकीत ती पूर्णत्वाला गेली. आमदार राजेश पाटील यांना सत्तारूढ गटातून ही संधी मिळाली. मात्र या वेळेच्या बदललेल्या राजकारणात या तालुक्याला मोठा फटका बसला. संपूर्ण जिल्ह्यातून मतदानाची आकडेवारी धरल्यामुळे या विभागावर अन्याय झाला.

हेही वाचा : गडकरींकडे नेतृत्व द्या : स्वामीनंतर महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजप नेत्याची मागणी 

या पराभवाची नेमकी कारणे काय याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. ते काहीही असले तरी सर्वाधिक दूध उत्पादन आणि दूध पुरवठा करणाऱ्या येथील उत्पादकांचे स्थानिक प्रतिनिधित्व हिरावले गेल्याच्या भावना तालुक्याच्या जनतेमध्ये आहेत.

स्वीकृत संचालकपदे चंदगडला देण्याची  मागणी 

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात दोन्ही स्वीकृत संचालक पदे चंदगड तालुक्याला द्यावीत, अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे यांनी जिल्हा दूध संघाकडे ही मागणी केली आहे. 

चंदगड तालुक्यातून दररोज सुमारे 90 हजार लिटरहून अधिक दूध संकलन जिल्हा दूध उत्पादक संघाकडे केले जाते. जिल्ह्यात सर्वाधिक म्हशीचे दूध पुरवठा करणारा तालुका म्हणून चंदगडची ओळख आहे. याच दुधाच्या दर्जावर संघाचा ब्रँड तयार होण्यास मदत झाली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे दोन्ही आघाडीतील उमेदवार पराभूत झाल्यामुळे दूध उत्पादक आणि जनतेत नाराजीचा सूर आहे. मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा करत असताना या तालुक्याला प्रतिनिधित्व द्यायला हवे, अशी मागणी जोर धरत आहे. 

संघामध्ये दोन संचालक स्वीकृत म्हणून घेण्याची मुभा आहे. या दोन्ही पदावर तालुक्यातील उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी पारसे यांनी केली आहे. तसे न झाल्यास जिल्हापातळीवर नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना तालुक्यातील जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल. त्याचे दीर्घकालीन परिणाम होती, असा इशारा देण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख