मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूल गेला वाहून

पुलाचा शंभर मीटरचा भाग वाहून गेला.
The bridge over the Vashishti river on the Mumbai-Goa highway was swept away
The bridge over the Vashishti river on the Mumbai-Goa highway was swept away

चिपळूण : वाशिष्ठी नदी आलेल्या पुरामुळे बहादूरशेख नाका येथील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलाचा शंभर मीटरचा भाग वाहून गेला. हा प्रकार शुक्रवारी (ता. २३ जुलै) पहाटेच्या सुमारास घडला. पुरामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यातच पुलाचा भाग वाहून गेल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प असून गाड्या पर्यायी मार्गाने आणल्या जात आहेत. (The bridge over the Vashishti river on the Mumbai-Goa highway was swept away)

गेले दोन दिवस वाशिष्ठी पुलावरून पाच ते सहा फूट पाणी सतत वेगाने वाहत होते. हा पूल ब्रिटिशकालीन असल्यामुळे तो कमकुवत झालेला होता. चौपदरीकरणांतर्गत नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला; परंतु आज पहाटेच्या सुमाराला पुलाचा काही भाग वाहून गेला होता. पुलाला भगदाड पडले आहे. तत्पूर्वी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाला धोकादायक जाहीर केले होते. 

पुलाच्या दुरुस्तीसाठी विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून तसेच राजकीय नेत्यांकडून सतत पाठपुरावा सुरू आहे; मात्र त्यात दुर्लक्ष झाले होते. शेजारील नव्या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईहून गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात येणारे सगळेच मार्ग बंद झाले आहेत. कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आंबा घाटही कळकदरा येथे खचला आहे. फोंडा घाटमार्गे रत्नागिरीकडे येणारी वाहतूकही खंडित झाली आहे. कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात येण्याचा तोही मार्ग बंद झाला आहे. सर्वच मार्ग बंद असल्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्यांची मात्र पंचाईत झाली आहे.

दरड कोसळल्याने आंबा घाट बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात गेली चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पश्चित महाराष्ट्राला जोडला जाणार आंबा घाटात वारंवार दरड कोसळत धोकादायक बनला आहे. आज पुन्हा दख्खन येथे मोठी दरड कोसळल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प आहे. मार्गावरील मलबा हटविण्याचे काम सुरू असले तरी शनिवारपर्यंत (ता. २४) मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आणि संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे. खेड, चिपळूण आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. दोन दिवस निळे येथे पाणी भरल्याने वाहतूक बंद होती. आता पाणी ओसरल्यामुळे वाहतूक सुरू झाली. मात्र आंबा घाटात सकाळी दोन ठिकाणी किरकोळ दरड कोसळली.त्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाकडून युद्धपातळीवर जेसीबी, डंपर लावून मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. शनिवारी (ता. 24) उशिरा वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आंबा घाट बंद असल्याने जिल्ह्यात दुध, भाजी-पाला आदीवर मोठा परिणाम झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com