गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती 

आज सकाळी पुन्हा सर्व संचालकांशी मोबाइलद्वारे चर्चा करून विश्वास पाटील यांच्या नावावर एकमत झाले.
गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती 
Vishwas Patil .jpg

कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नूतन अध्यक्षपदी विश्वास नारायण पाटील याच्या नावावर पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज शिक्का मोर्तब केले. नवनिर्वाचित संचालकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Appointment of Vishwas Patil as the President of Gokul)

काल तब्बल अडीच तास बैठक घेऊन संचालकांची मते जाणून घेतली होती. मात्र निर्णय झाला नव्हता. त्यामुळे आज सकाळी पुन्हा सर्व संचालकांशी मोबाइलद्वारे चर्चा करून विश्वास पाटील यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर चिठ्ठीव्दारे हे नाव बंद लिफाफ्यात गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात पाठवण्यात आले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

यावेळी पाटील यांनी ''गोकुळ दुध उत्पादकांना प्रतिलीटर दोन रूपये दरवाढ देण्याची घोषणा केली होती. ती लवकरच पूर्ण केली जाईल. गोकुळ दुध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. गोकुळला नवे वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करुन असे सांगितले.'' यावेळी सत्तारूढमधील सर्व संचालक पिवळे फेटे बांधून सभागृहात उपस्थित होते. निवडीनंतर दोन्हीही मंत्र्याचा जयघोष केला. 

दरम्यान, गोकुळमध्ये (Gokul) सत्तांतर घडविलेल्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीतून ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे (Arun Dongale) व विश्‍वास पाटील (Vishwas Patil) या दोघांपैकी कोणाची अध्यक्षपदावर निवड होणार, याविषयी उत्सुकता होती. मात्र, शेवटी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

विश्‍वास पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सत्तारूढ गटाला सोडचिठ्ठी देत विरोधी आघाडीची कास धरली होती. त्यामुळे त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. 

तूर्त उपाध्यक्षपद नाहीच...

संघात उपाध्यक्षपद निर्माण करण्याचे संकेत मिळत असले, तरी सद्यस्थितीत ते शक्‍य नाही. यासाठी पहिल्यांदा संचालक मंडळात तसा ठराव करून त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर हा प्रस्ताव सहकार निबंधकांकडे पाठवावा लागतो, त्यांच्या मंजुरीनंतर उपाध्यक्षपद तयार होईल. ही प्रक्रिया दीर्घकाळाची असल्याने  सध्या फक्त अध्यक्षांचीच झाली आहे. पण, भविष्यात संघात उपाध्यक्षपदही निर्माण केले जाण्याचे संकेत आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in