सर्वपक्षीय आमदारांनो, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी एकत्र येऊया  - All party MLAs, let's come together to help farmers : Bhaskar Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

 सर्वपक्षीय आमदारांनो, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी एकत्र येऊया 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार जाधव यांनी केले. 

चिपळूण : कोकणातील बळिराजा कठिण व अस्मानी संकटात पुरता उद्‌ध्वस्त झाला आहे. त्याच्या पाठिशी आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी उभे राहिले पाहिजे. ही वेळ सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आहे. कोकणातील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील सर्वपक्षीय आमदारांना केले आहे. 

माजी मंत्री जाधव म्हणाले की, प्रचंड प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग कधी नव्हे इतका मोठ्या संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने उभी पिके, कापून ठेवलेली पिके, कापून शेतामध्ये साठवून ठेवलेली पिकेसुध्दा डोळ्यादेखत वाहून जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावे लागले आहे. याची तातडीने दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुहागर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यांमध्ये महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे पंचनामे करण्यास सुरूवात केलेली आहे. आपल्याकडे ज्यावेळी पिके परिपक्व होण्याच्या परिस्थितीत आली होती, त्याचवेळी सतत पाऊस पडत होता. त्यामुळे भात किंवा नाचणी यांच्या लोंबीवर किंवा कणसांवर दाणे दिसत असले तरी ते पोचे आहेत. याचाही विचार पंचनामे करतेवेळी संबंधित अधिकाऱ्यांना करण्यास मी सांगितले आहे, असे आमदार भास्कर जाधव यांनी नमूद केले. 

कोकणातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागांत फिरून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करावे आणि अधिकचे पंचनामे करून घ्यावेत, जेणेकरून या संकटात उद्‌ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याकरता अधिक सोयीचे होईल. याविषयी मी सातत्याने अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बोलत आहेत. काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार जाधव यांनी केले. 

हेही वाचा : संकट मोठे आहे, त्यावर मात करू; पण धीर सोडू नका 

उमरगा : नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात या भागातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना वेदना देणारी आहे. अस्मानी संकट कोसळल्याने राज्य सरकार मदत करेल. पण, राज्य सरकारला काही मर्यादा असल्याने केंद्र सरकारची मदत महत्वाची आहे, त्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे. संकट निश्‍चितच मोठे आहे, त्यावर एकत्रितपणे मात करू, पण तुम्ही धीर सोडू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

उमरगा, लोहारा तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे शेतीसह पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी रविवारी सास्तूर, राजेगाव - कवठा शिवारातील नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, पवार यांनी महाप्रलंयकारी भूकंपानंतर केलेल्या मदतीमुळे आधार मिळालेल्या भूकंपग्रस्त भागात दौरा केल्याने येथील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

लोहारा तालुक्‍यातील सास्तुर, राजेगाव येथील व परिसरातील अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पवार यांनी पाहणी केली. या वेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, माजी आमदार राहुल मोटे, जीवनराव गोरे आदींची उपस्थिती होती. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख