दरेकरांनंतर चंद्रकांतदादांच्या दौऱ्यालाही संजयकाका पाटलांची दांडी  - After Darekar, Sanjaykaka Patil's is also absent for Chandrakantdada's tour | Politics Marathi News - Sarkarnama

दरेकरांनंतर चंद्रकांतदादांच्या दौऱ्यालाही संजयकाका पाटलांची दांडी 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

दरेकर यांच्या दौऱ्यात खासदार संजयकाका पाटील हे हजर नव्हते.

सांगली : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकताच सांगलीचा नुकसान पाहणी दौरा केला होता. त्या वेळी भाजपचे खासदार संजयकाका पाटील हे हजर नव्हते. त्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यातही भाजपचे खासदार संजय पाटील हजर नव्हते. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर "ते खासदार आहेत, दिल्लीत त्यांच्याकडे काही जबाबदारीची कामे असतात. त्यामुळे ते दिल्लीत जास्त वेळ असावेत,' असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी वेळ मारून नेली. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दरेकर यांनी पाहणी करत सरकारला मदतीसाठी धारेवर धरले होते. त्यांच्या दौऱ्यात गैरहजर असलेल्या खासदार संजय पाटील यांची त्यावेळीही चर्चा झाली होती. त्यानंतर आज खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सात कोटींच्या विकास कामांच्या उद्‌घाटनप्रसंगी तसेच मिरजेतील ट्रिमिक्‍स रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ करण्यासाठी सांगलीत आले होते. त्यांच्या दौऱ्याकडे खासदारांनी पाठ फिरवली. त्याची चर्चा सांगलीत जोरात रंगली आहे. 

या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की सांगली महापालिकेवर पहिल्यांदाच "ब्रॅंडेड भाजप'ची सत्ता आली असून नागरिकांनी दाखवलेला विश्‍वास आम्ही सार्थ ठरवू. इथल्या कारभारावर आणि प्रशासनावर भाजपचेच नियंत्रण आहे आणि यापुढेही असेल. 

महापौर गीता सुतार यांनी जयंत पाटील यांना "डोक्‍यावर हात असू द्या', असे आवाहन केले होते, जयंतरावांनी त्यावर "इनामदार, देशपांडे यांच्यावर माझे प्रेम आहे', असे सांगत त्यांच्या उपस्थितीत महापालिकेत येऊ, अशी ग्वाही दिली होती. त्यावर इनामदारांनी जयंतरावांसाठी आवतन दिले. 

या साऱ्याचा अर्थ पुन्हा बीजेपीची वाटचाल "जेजीपी'कडे चालली आहे का, या प्रश्‍नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ""निवडणुका पंधरा दिवसांच्या आहेत. त्यानंतर विकासासाठी साऱ्यांनी एकत्र यावे, हेच अपेक्षित असते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, जयंत पाटील पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे काही चुकीचे नाही.'' 

ते म्हणाले, "महापालिकेवर भाजपचेच नियंत्रण आहे. तेथे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे पूर्ण लक्ष आहे आणि त्यांच्या कारभारावर आमचे लक्ष आहे. आता राज्यात जे सरकार असेल त्यांच्याशी संवाद साधणे, हे अधिकाऱ्यांना गरजेचे असते. त्यामुळे आमचे नियंत्रण नाही, असे म्हणता येणार नाही. अर्थात, आम्ही गाफील नाही.'' 

"सत्ता आल्यानंतर आम्ही विकासाचा कसोशीने प्रयत्न करीत आहोत. आज घंटागाड्यांपासून रस्त्यांपर्यंत महत्वाची कामे मार्गी लागत आहेत. कुपवाडचे ड्रेनेज, शिवाजी क्रीडांगणाचा विकास, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशी कित्येक वर्षे रखडलेली कामे पूर्ण होत आहेत. मनपा जिंका आम्ही 100 कोटी रुपये देतो, असे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. ते त्यांनी दिले आणि त्यातून अनेक कामे पूर्ण झाली. आम्ही विश्‍वासाने अपेक्षापूर्ती करत आहोत,'' असे पाटील यांनी नमूद केले. 

आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, महापौर गीता सुतार, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे, सभापती पांडुरंग कोरे, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी, गटनेते युवराज बावडेकर, आयुक्त नितीन कापडणीस आदी या वेळी उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख