सत्तांतर होताच ‘गोकुळ’च्या २०० रोजंदारी कर्मचाऱ्यांना नारळ  

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कामावर आलेल्या या कर्मचाऱ्यांना गेटवरूनच परत पाठवण्यात आले.
200 employees of Gokul Dudh Sangh were sacked
200 employees of Gokul Dudh Sangh were sacked

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्हा दूध संघात (गोकुळ, Gokul) ‘लाख’ मोलाची रोजंदारी कर्मचारी म्हणून नोकरी मिळविलेल्या सुमारे २०० कर्मचाऱ्यांना (200 employees) एकाच दिवशी घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तडजोडीतून मिळवलेली नोकरी गेल्याने आणि भविष्यात पुन्हा संधी मिळेल का नाही, या भीतीपोटी या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यात सर्वच संचालकांनी भरलेल्या लोकांचा समावेश आहे. (200 employees of Gokul Dudh Sangh were sacked)

‘गोकुळ’ मध्ये तब्बल ३० वर्षानंतर सत्तांतर घडवून आणताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर नूतन संचालकांनी दिलेल्या पहिल्याच भेटीत संचालक नविद मुश्रीफ यांनी हॉटेलमधील संघाचे खाते बंद करण्याबरोबरच हार, तुरे व पुष्पगुच्छ न आणण्याची सूचना केली होती.

याच भेटीत काही संचालकांनी गेल्या तीन-चार महिन्यांत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भरती केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना घरी घालवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कामावर आलेल्या या कर्मचाऱ्यांना गेटवरूनच परत पाठवण्यात आले.

‘गोकुळ’ मधील नोकरभरती हा आतापर्यंत कायमच चर्चेचा विषय राहीला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांत ठरावदारांची मुले, त्यांच्या नातेवाईकांच्या मुलांना रोजंदारी कर्मचारी म्हणून कामावर घेण्यात आले होते. अर्थात त्यासाठी काही व्यवहारही झाल्याची चर्चा आहे. लाखो रूपये मोजून या लोकांनी संचालकांमार्फत नोकऱ्या मिळवल्या. यातही काहींना कारकून म्हणून काम देतो, असे सांगून कॅन धुवायला लावणे, स्वच्छता करणे यासारखी कामे लावण्यात आली आहेत. अशा कर्मचाऱ्यांनी ही नोकरीच नको, असे म्हणत दिलेल्या पैशासाठी संबंधितांकडे तगादा लावला आहे. आता गेल्या दोन दिवसांत या सर्वच कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत कामावरच न येण्याचे आदेश दिल्याने ‘लाख’ मोल देऊन नोकरी मिळवलेल्या या कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.

जनसंपर्क अधिकाऱ्याला हटवले

निवडणूक निकालानंतर संघात सुडाचे राजकारण करणार नाही, अशी जाहीर घोषणा नेत्यांनी केली होती. पण, त्याची शाई वाळण्यापूर्वीच पहिल्यांदा संघात जनसंपर्क अधिकारी पी. आर. पाटील यांना हटवून त्यांच्या जागी सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय काही शिपाई आणि तृत्तीय श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्याही गेल्या दोन-तीन दिवसांत करण्यात आल्या आहेत.

काहींच्या बदल्या कराव्या लागणार : पाटील

आकृत्तीबंधनुसार संघात जेवढे आवश्‍यक कर्मचारी आहेत, त्यांना ठेवून इतरांना कमी करण्यात येणार आहे. अजून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्णय व्हायचा आहे, किती कर्मचारी आहेत, ते पाहून निर्णय होईल. काही लोकांच्या बदल्याही कराव्या लागणार आहेत, असे गोकुळचे नूतन अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com