गावाकडे निघालेल्या तरुणीचे कोयत्याच्या धाकाने दिवे घाटातून अपहरण 

या गंभीर घटनेतील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरूद्ध यापूर्वी संबंधित तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे.
A young woman on her way to the village was abducted from Dive Ghat
A young woman on her way to the village was abducted from Dive Ghat

लोणी काळभोर (जि. पुणे) : पुरंदर तालुक्‍यातील मूळगावी चुलत भावासोबत दुचाकीवरून निघालेल्या तरुणीचे दिवे घाटात आज (ता. 3 ऑक्‍टोबर) सकाळी तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून अपहरण केले. 

त्या तिघांनी केलेल्या मारहाणीत तरुणीचा भाऊ जखमी झाला आहे. या घटनेनंतर जखमी अवस्थेत तरुणाने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी अनिस पठाण (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) याच्यासह त्याच्या दोघा साथीदारांविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, या गंभीर घटनेतील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरूद्ध यापूर्वी संबंधित तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीईटीची परीक्षा असल्याने अपहरण झालेली 19 वर्षीय तरुणी भावासोबत पुण्यात आली होती. परीक्षा दिल्यानंतर ती शुक्रवारीच (ता. 2 ऑक्‍टोब) मूळगावी निघाली होती. मात्र पाऊस येत असल्याने पूर्वी राहत असलेल्या हडपसर परिसरातील घरी मुक्कामी थांबली होती. आज सकाळी सातच्या सुमारास भावाच्या दुचाकीवरून ती मूळगावी निघाली होती. त्यावेळी दिवे घाटात मागून येणाऱ्या लाल रंगाच्या स्वीफ्ट (एमएच 12, सीवाय 7056) मोटारीने त्यांच्या दुचाकीला मोटार आडवी घातली. त्याचवेळी अनिस पठाण हा आणखी एका साथीदारासह पल्सर दुचाकीवरून (एमएच 12, क्‍यूएस 8108) घटनास्थळी आला. 

संबंधित तरुणीला तो खेचू लागताच तिच्या भावाने प्रतिकार केला, त्या वेळी अनिस याने शर्टच्या मागील बाजूस लपवलेला कोयता काढून त्याच्या हातापायावर उलट्या बाजूने मारला. तरीही संबंधित तरुणाने प्रतिकार केला. त्या वेळी अनिस याच्यासह त्याचा साथीदार व स्वीफ्ट चालकाने त्याला मारहाण केली. त्यानंतर अनिस पठाणने संबंधित तरुणीला त्याच्या दुचाकीवरून जबरदस्तीने हडपसरच्या दिशने पळवून नेले. 

या प्रकारानंतर जखमी अवस्थेतील तरुणाने उरूळी देवाची पोलिस चौकीत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारार्थ दाखल करून पठाणसह तिघांविरूद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. संबंधित तरुणीवर वर्षभरापूर्वी पठाण याने बलात्कार केला होता. तिच्या फिर्यादीवरून पठाण याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

याच कारणावरून 14 सप्टेंबर रोजी पठाण व त्यांच्या मित्रांनी संबंधित तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना मूळ गावी जाऊन मारहाण केल्याने त्यांच्याविरूद्ध जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळेच संबंधित तरुणीचा भाऊ पठाण यास ओळखत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com