पंकजा मुंडेंनी शरद पवारांचे कौतुक केले त्यात चुकीचे काय?  - What's wrong with Pankaja Munde praising Sharad Pawar? | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडेंनी शरद पवारांचे कौतुक केले त्यात चुकीचे काय? 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

राज्य चालविण्याचे कॉन्ट्रॅक्‍ट शरद पवारांकडेच दिलेले आहे.

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घर सोडून बाहेर पडत नाहीत. ऑनलाइन कॉन्फरन्स घेऊन कुणाशीही चर्चा करत नाहीत. ते काय राज्य चालवणार आणि प्रश्‍न सोडवणार? हे राज्य चालविण्याचे कॉन्ट्रॅक्‍ट शरद पवारांकडेच दिलेले आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 29 ऑक्‍टोबर) पत्रकार परिषदेत लगावला. 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या विकास कामांचे उद्‌घाटन करण्यासाठी चंद्रकांत पाटील आज सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन काही प्रश्‍न मांडले. त्याबाबत तुम्ही शरद पवार यांना भेटा, असा सल्ला कोश्‍यारी यांनी दिला. 

राज्यपाल कोश्‍यारी यांनी मुख्यमंत्र्यांना भेटा, असा सल्ला देण्याऐवजी पवारांना भेटा, असे सांगणे योग्य आहे का, या प्रश्‍नावर पाटील यांनी टोलेबाजी केली. 

ते म्हणाले, "राज्यपाल आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय झाले, हे मला माहिती नाही. मात्र, राज्यपाल तसे म्हटले असतील तर त्यात चुकीचे काय आहे? मुख्यमंत्र्यांना काही सांगून उपयोग आहे का? ते कुठे राज्य चालवतात. ते घरातून बाहेर पडत नाहीत. शरद पवार यांच्याकडे प्रश्‍न घेऊन गेले, तरच काहीतरी फायदा आहे, कारण त्यांच्याकडेच राज्य चालवण्याचे कॉन्ट्रॅक्‍ट आहे.'' 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करून शरद पवार यांचे कौतुक केले आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, "ही आपली संस्कृती आहे. पक्ष कुठलाही असो, काम करणाऱ्या माणसाचे कौतुक केले पाहिजे. शरद पवार या वयात राज्यभर फिरत आहेत, ही कौतुकाची बाब आहेच, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घर सोडायला तयार नसताना पवारांनी फिरावे, याचे कौतुक केले, तर चुकीचे काय आहे.'' 

सरकार ऐकत नसेल तर बोलून उपयोग काय? 

राज्यातील मंदिरे उघडावीत, या साठी आम्ही प्रचंड आग्रही मागणी केली. परंतु, त्याकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. मंदिरात येणाऱ्या दक्षिणेवर अवलंबून असणाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. नियम व अटींसह मंदिरे उघडावीत. सॅनिटायझर, मास्क, तापमापक हे ठेवता येईल. एकावेळी दहाच लोकांना प्रवेश देता येईल. गर्दी टाळण्यासाठी दर्शनाचे बुकिंग सुरू करता येईल. सरकार ऐकतच नसेल तर बोलून उपयोग काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख