तो धोका टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून महेश कोठेंना चर्चेचे निमंत्रण  - Uddhav Thackeray invites Mahesh Kothe for discussion to avoid that threat | Politics Marathi News - Sarkarnama

तो धोका टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून महेश कोठेंना चर्चेचे निमंत्रण 

तात्या लांडगे 
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

त्यामागे कोठेंविरुद्ध सर्वपक्षीय राजकीय खेळी झाल्याची चर्चा आजही शहरात होते.

सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून अपेक्षित असलेली उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आल्याने नाराज झालेल्या महेश कोठे यांनी बंडाची झेंडा हाती घेत अपक्ष निवडणूक लढवली. शहरात बऱ्यापैकी ताकद असलेल्या कोठेंनी महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे बंडखोरीनंतर कोठे यांच्यावर शिवसेनेकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती. पण, कुरघोडीच्या राजकारणामुळे ते पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, नाराज कोठे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार, अशी चर्चा असताना ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याही संपर्कात असल्याची कुजबूज शहरात आहे. ते भाजपत गेले तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीसह शिवसेनेला त्याचा फटका बसू शकतो. तो टाळण्यासाठी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना "मातोश्री'वर चर्चेसाठी बोलावल्याची चर्चा आहे. 

कॉंग्रेसचे अमोल शिंदे यांनी महेश कोठेंवर निष्ठा दाखवत धनुष्यबाण हाती घेतला होता. त्यावेळी शिंदे यांना महापालिकेतील पद देण्याचा शब्द कोठे यांनी दिला होता. मात्र, शिवसेनेतील काही नगरसेवक तसे होऊ नये, कोठेंबद्दलची नाराजी वाढावी, त्यांनी पक्ष सोडून जावा या प्रयत्नांत असल्याची चर्चा आहे. 

विधानसभा निवडणुकीतही महेश कोठे यांचे तिकिट कापून दक्षिण सोलापूरचे तत्कालीन आमदार दिलीप माने यांना "शहर मध्य'मधून तिकिट देण्यात आले होते. त्यामागे कोठेंविरुद्ध सर्वपक्षीय राजकीय खेळी झाल्याची चर्चा आजही शहरात होते. युती असतानाही शिवसेनेतील काही नगरसेवकांनी कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार केला, तर काहीजण तटस्थ राहिले, असाही आरोप त्या वेळी झाला. त्यानंतरही तत्कालीन संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी संबंधितांवर कारवाई केली नाही. 

महापालिकेचा स्थायी समितीचा सभागृह नेता निवडीवेळीही कोठेंनी गणेश वानकर यांचे नाव देऊन निवडही अंतिम झाली असतानाही सावंतांनी नाव बदलल्याची चर्चा आहे. आता विरोधी पक्षनेता बदलल्यानंतर कोठेंना कुठेही संधी मिळू नये; म्हणून पक्षातील काही नगरसेवक विरोधी पक्षातील आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत डावपेच आखत असल्याची चर्चा असून ते कोठेंपर्यंत पोचल्याची माहिती आहे. त्यातून त्यांच्याबाबत पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दुसऱ्यांदा सोलापुरात आले. त्यावेळी महेश कोठे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजार होते. पहिल्या दिवशी दौऱ्यात न दिसलेले कोठे दुसऱ्या दिवशी थेट विमानतळावर पहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ देत त्यांच्याशी चर्चा केली आणि "मातोश्री'वर चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले. महापालिका विरोधी पक्षनेते पदावरून पायउतार झाल्यानंतर आपल्याला विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी अपेक्षा कोठे यांना आहे.

मात्र, शिवसेनेत कोणतीही संधी न मिळाल्यास कोठे पक्ष सोडतील आणि त्यानंतर शहरातील तीनही मतदारसंघात व महापालिकेतही भाजपची ताकद वाढेल, अशी शक्‍यता काही नेतेमंडळींनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडूनच कोठेंची कशा प्रकारे समजूत घातले जाते, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख