वाबळेवाडी शाळेच्या मुख्याध्यापकांसह तीन शिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा

बाहेरील व्यक्तींकडून कामकाजात होत असलेल्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ त्यांनी हा निर्णय घेतला.
Tired of the education system, three teachers including the headmaster of Wablewadi school resigned
Tired of the education system, three teachers including the headmaster of Wablewadi school resigned

शिक्रापूर (जि. पुणे) : जेमतेम ३२ विद्यार्थीसंख्येवर २०१२ मध्ये सुरू झालेली शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने ग्रामस्थांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांचा पट नऊ वर्षांत ५१४ पर्यंत नेला. देशविदेशातील नामांकित शाळांसोबत सामंजस्य करार करून अभिनव शिक्षणपद्धती विकसित केलेल्या या शाळेचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रेय वाबळे यांनी मुख्याध्यापक पद आणि शासकीय सेवेचा आज (ता. २२ जुलै) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारी शिक्षक एकनाथ खैरे, केंदूर (ता. शिरूर) येथील मुख्याध्यापक जयसिंग नऱ्हे यांनीही राजीनामा दिला आहे. बाहेरील व्यक्तींकडून कामकाजात होत असलेल्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ त्यांनी हा निर्णय घेतला. (Tired of the education system, three teachers including the headmaster of Wablewadi school resigned)    
        
नावीन्यपूर्ण उपक्रमांनी देशभर नावाजलेले व देश-विदेशातील शाळांशी सामंजस्य करार करून अभिनव शिक्षण पद्धती लागू केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शिक्षक दत्तात्रेय वारे यांना कोंडीत पकडून शाळा बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. याबाबत ग्रामस्थांनीही प्रशासनाकडे तशा तक्रारी केल्या होत्या. शाळेत ग्रामस्थांकडून सुरू केलेल्या इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये वारे व इतर शिक्षकांना ओढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी जाणीवपूर्वक झाला. हा प्रकार असह्य झाल्याने वारे यांनी आज राजीनामा दिला. 

वाबळेवाडी ग्रामस्थांनी त्यांना दिवसभर समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अपयशी ठरला. वारे यांच्या समवेतच त्यांचे सहकारी शिक्षक एकनाथ खैरे, केंदूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग नऱ्हे यांनीही मुख्याध्यापकपदासह शासकीय सेवेचा आज शिरूर पंचायत समिती कार्यालयात राजीनामा सादर केला. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती तसेच वाबळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच केशवराव वाबळे, सतीश वाबळे, भगवानराव वाबळे, सतीश कोठावळे आदींनीही या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.  

वाबळेवाडी शाळा पालकांकडून ५ ते २५ हजारांच्या देणग्या घेत असल्याची तक्रार आल्याने प्रशासनाकडून शाळेकडे माहिती मागविली होती. ज्यांच्या पाल्यांना या शाळेत प्रवेश मिळाला नाही, अशा काहींनी जिल्हा परिषदेकडे शाळेच्या तक्रारी केल्या. शाळेतील एकाही पालकाची तक्रार नसताना बाहेरील व्यक्तीच्या तक्रारीवरुन वाबळेवाडीत गदारोळ सुरू झाला आहे. 

शाळेबाबत निर्माण झालेल्या वादाबाबत माजी सरपंच केशव वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, सतीश वाबळे, उद्योजक शंकर वाबळे, भगवानराव वाबळे यांनी जाहीर केले होते की, शाळेसाठी आम्ही गावची यात्रा व गणेशोत्सव बंद करून प्रतिवर्षी दीड लाख रुपये शाळा उभारणीसाठी देणे सुरू केले. लॉकडाऊनच्या काळातसुद्धा ऑनलाईन पद्धतीने चालणारी जिल्हा परिषदेची राज्यातील एकमेव शाळा आमची आहे. शाळेत सहावीच्या पुढील सर्व विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स, इंग्लिश-अमेरिकन अ‍ॅक्सेंट भाषा, तेलगू, गुजराथी, जपानी, फ्रेंच भाषा तसेच संगीत विशारदपर्यंतचे शिक्षण दिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक नाही तर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अभियांत्रिकी पदवी झालेल्या शिक्षकांसह एकुण १६ खासगी शिक्षक नेमले आहेत. 

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा सचिन वाबळे म्हणाल्या की, शाळा आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून विद्यार्थीहितासाठी आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत. शाळेच्या एकाही आर्थिक व्यवहारात मुख्याध्यापक वारे यांचा सहभाग नसताना त्यांना प्रशासकीय अडचणीत अडकविण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या दर्जावर बोलण्याऐवजी विषय भलतीकडे नेण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल वारे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. 

...आणि वारेंनी घेतला राजीनाम्याचा निर्णय

गेल्या आठ दिवसांपासून चाललेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमिवर ता. २१ जुलै रोजी दुपारी शिरूर येथे एका राजकीय नेत्याने त्यांना ग्रामस्थांकरवी जबरदस्तीने बोलावून घेतले होते. कुठल्याच प्रशासकीय प्रक्रियेशिवाय असे कुणा राजकारण्यांना भेटण्याचे तसेच, तेथील दबावाच्या संवादाचे परिणाम वारे यांच्यावर झाले आणि बुधवारी (ता. २१ जुलै) रात्रीच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाबळेवाडी ग्रामस्थांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com