....म्हणून स्थगित केला ऊसतोड मजुरांचा संप : सुरेश धस  - .... Therefore, the strike of sugarcane workers was suspension : Suresh Dhas | Politics Marathi News - Sarkarnama

....म्हणून स्थगित केला ऊसतोड मजुरांचा संप : सुरेश धस 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

आम्ही संघर्षाला घाबरत नाही.

पुणे : संप लांबला तर लेबर पळवापळवी होते, त्यातून मुकादम अडचणीत येतात, मुकदमांचे संसार उघड्यावर येऊ नयेत म्हणून मी माझ्या संघटनेचा संप स्थगित करीत आहे. पण, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास दोन महिन्यांनंतर उसाच्या फडात जाऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य (आमदार) सुरेश धस यांनी दिला. 

ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज (ता. 27 ऑक्‍टोबर) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत धस यांना सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र त्यांनी गेटवरच आंदोलन सुरू केल्यामुळे त्यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. 

बैठकीस सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. सुरेश धस हे गेले काही दिवस आक्रमकपणे या मजुरांचे प्रश्न मांडत आहेत. तसेच तोडगा निघाल्याशिवाय मजुरांना साखर कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन ते करत होते. तसेच ऊसतोड मजुरांच्या मजुरीदरात शंभर टक्‍क्‍यांहून अधिक वाढीची आक्रमक मागणी त्यांनी लावून धरली होती. 

होय, आम्ही आरडाओरड केली. आम्ही बीडवाले आहोत आणि आम्ही संघर्षाला घाबरत नाही, असे सांगून धस म्हणाले की, आज लवादाची बैठक नव्हती. या प्रश्‍नावर आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची ही बैठक होती.

आज आम्ही गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून शरद पवारांच्या समोर आमच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यात आम्ही दीडशे टक्के मजुरी वाढविण्याची मागणी केली आहे. त्यातील किमान 85 टक्के वाढ मिळावी, त्याच्याखाली आम्ही येणार नाही. 

संप लांबला, तर मजुरांची पळवा पळवी होते, त्यातून मुकदमांचे संसार उघड्यावर येऊ नयेत; म्हणून मी माझ्या संघटनेचा संप स्थगित करीत आहे, असे धस यांनी सांगितले. 

इतर संघटनांनी काय मागण्या केल्या, ते त्यांनाच विचारा. असे सांगून आम्हाला कमीत कमी वाढ 85 टक्के करावी. त्याखाली आम्ही येणार नाही. मात्र, आमची मागणी मान्य न झाल्यास दोन महिन्यांनंतर आम्ही पुन्हा फडावर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. 

समान काम आणि समान वेतन या कायद्यानुसार आम्हालाही हार्वेस्टरप्रमाणे भाव द्यावा, अशी मागणी धस यांनी केली.  हार्वेस्टरला टनाला 400 रुपये दिला जातो, तर कामगारांना टनाला 267 रुपये भाव मिळतो. त्यामुळे हार्वेस्टरप्रमाणे मजुरांनाही भाव द्या, अशी मागणी त्यांनी केली. मशिनमुळे उसाचे तुकडे होतात, त्यातून रिकव्हरी कमी होते, असेही त्यांनी नमूद केले. 

सहकार, कामगार आणि सामाजिक न्याय विभाग तसेच साखर संघ यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात आणावा आणि मंजूर करून घ्यावा, अशीही मागणी आपण केली आहे, त्यानुसार तसे बिल येत्या अधिवेशनात मांडण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे, असे धस म्हणाले. 

Edited By Vijay Dudhale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख