चिंता वाढली : ग्रामीणमधील रुग्णसंख्या कमी होईना; २१ मे पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाउन - There will be severe lockdown in rural areas of Solapur district from May 21) | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

चिंता वाढली : ग्रामीणमधील रुग्णसंख्या कमी होईना; २१ मे पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाउन

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 मे 2021

तरूण रूग्ण कोरोनाचे बळी ठरत आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur district) ग्रामीण भागात कडक संचार बंदीनंतर (ता. 23 एप्रिल ते 18 मे) तब्बल 47 हजार रूग्ण वाढले आहेत, तर आठशेहून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ऍक्‍टिव्ह रूग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. लॉकडाउनपूर्वी उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या ग्रामीण भागात आठ हजार 373 होती. सध्या 17 हजार रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ही चिंताजनक परिस्थिती बदलावी, या हेतूने ता.  21 मे ते 1 जूनच्या सकाळी सातपर्यंत कडक लॉकडाउन (severe lockdown) करण्याचा निर्णय सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी घेतला आहे. (There will be severe lockdown in rural areas of Solapur district from May 21)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या हेतूने राज्य सरकारने 'ब्रेक द चेन'अंतर्गत 23 एप्रिलपासून कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. कडक संचारबंदीला आता 26 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही ग्रामीण भागातील रूग्णसंख्या आटोक्‍यात आलेली नाही. चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

त्यात पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माढा या तालुक्‍यांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍याचा मृत्यूदर सर्वाधिक असून तरूण रूग्ण कोरोनाचे बळी ठरत आहेत. तरीही, नियमांचे उल्लंघन करीत गावोगावी फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर आता जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नवे आदेश काढत दहा दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : कोशियारींपासून फडणवीसांपर्यत अन्‌ पवारांपासून थोरातांपर्यंत ‘नार्वेकर’ नावाची चलती!

जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, किरकोळ, ठोस विक्रेते, व्यापाऱ्यांसह सर्व दुकाने राहणार बंद आहेत. या काळात किरणा माल, भाजीपाला, फळविक्री, पाळीव प्राण्यांचे खाद्यपदार्थाची दुकानदारांना सकाळी सात ते अकरापर्यंत घरपोच सेवा देता येणार आहे. कृषी आवजारे, शेती उत्पादनाशी संबंधित दुकाने, कृषी सेवा केंद्रे सकाळी सात ते अकरापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

उपहारगृहे, लॉज, हॉटेल, मॉल, बाजार, मार्केटसह वाईन शॉप, बिअरबार, देशी दारू दुकानेही बंद राहणार आहेत. घरपोच सेवांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृहांना परवानगी असेल. कृषी उत्पन्न बाजार समिती, बेकरी, किरकोळ व ठोक विक्रीची दुकाने, आठवडी व दैनंदिन बाजारालाही परवानगी देण्यात आलेली नाही. धार्मिक प्रार्थनास्थळे, सिनेमागृहे, नाट्यगृहे व सभागृहे, गेम पार्लरही बंद राहणार आहेत.

शाळा, महाविद्यालये, जल क्रीडा स्थळे, केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर ही आधीच्या नियमानुसार बंदच राहणार आहेत. रूग्णालये, लसीकरण केंद्रे, औषध दुकाने, औषध कंपन्या, आरोग्य सेवा पुरविणारी उपकरणे व त्या सेवांना कच्चा माल पुरविणाऱ्यांना मात्र परवानगी देण्यात आली आहे. घरपोच दूध वितरणास सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत परवानगी; सवलत दिलेल्यांकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

शुक्रवारपासून  कडक अंमलबजावणी 

सोलापूर  शहरातील रूग्णसंख्या कमी होऊ लागली असली तरी ग्रामीण भागामध्ये रूग्णांबरोबरच मृत्यूदरही वाढत आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी उशिरा का होईना, पण जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी स्वतंत्र आदेश काढले. तत्पूर्वी, अचानक आदेश काढल्यानंतर लोकांची गैरसोय होऊ नये; म्हणून सोमवारी (ता. 17 मे) रात्री उशिरा प्रसिध्दीपत्रक जाहीर केले. त्यानुसार शुक्रवारपासून (ता. 21 मे) कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख