बारामतीच्या चहावाल्याने केली पंतप्रधान मोदींना शंभर रुपयांची मनीऑर्डर  - A tea vendor from Baramati made a money order of Rs 100 to Prime Minister Modi | Politics Marathi News - Sarkarnama

बारामतीच्या चहावाल्याने केली पंतप्रधान मोदींना शंभर रुपयांची मनीऑर्डर 

मिलिंद संगई  
बुधवार, 9 जून 2021

एकीकडे त्यांची दाढी वाढते आहे, तर दुसरीकडे देशातील समस्याही वाढत आहेत.

बारामती : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे कमालीचे हाल झाले. या काळात उत्पन्न काहीही नसताना खर्च मात्र नेहमीप्रमाणे करावाच लागत होता. त्यातच ज्यांच्या घरातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांची तर आर्थिक, मानसिकदृष्ट्या प्रचंड कुचंबणा झाली. बारामतीतील एका चहा विक्रेत्याने ही व्यथा थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडण्याचे काम केले. (A tea vendor from Baramati made a money order of Rs 100 to Prime Minister Modi)

सर्वसामान्यांची आर्थिक व्यथा समजून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही तरी मदतीचा हात पुढे करतील या अपेक्षेने बारामतीतील अनिल मोरे या चहाविक्रेत्याने थेट नरेंद्र मोदी यांच्या नावाने शंभर रुपयांची मनीऑर्डर केली आहे. मोरे यांनी पंतप्रधानांना केलेली मनीऑर्डर ही दाढी करण्यासाठी पाठवलेली आहे. मनीऑर्डरसोबतच रजिस्टर पत्राद्वारे आपल्या काही मागण्याही त्यांनी पाठविल्या आहेत.
 
बारामती शहरातील एका रुग्णालयासमोर चहाचा गाडा चालविणारे अनिल मोरे यांना लॉकडाऊनच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत. या काळात घर चालविण्याची पंचाईत त्यांच्यापुढे होती. त्या मुळे त्यांनी वैतागून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला. अनोख्या पद्धतीने त्यांनी सर्वसामान्यांच्या व्यथेकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मोरे यांनी केला आहे. 

हेही वाचा : पुन्हा राजकीय संकट...काँग्रेसच्या 18 आमदारांचा सरकारला अल्टिमेटम

मोरे यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर आरोग्याच्या सोयी, रोजगाराच्या संधी, कोरोना प्रतिबंधक लशींची संख्या वाढवायला हवी. पंतप्रधान मोदी हे देशाचे नेते आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे. पण, एकीकडे त्यांची दाढी वाढते आहे, तर दुसरीकडे देशातील समस्याही वाढत आहेत. कोरोनाने ज्या कुटुंबीयांनी आपला सदस्य गमावला आहे. त्यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत करा. तसेच, या पुढील काळात लॉकडाऊन जाहीर केल्यास कुटुंबाला किमान तीस हजारांची मदत करण्याची मागणी चहाविक्रेते असलेले अनिल मोरे यांनी केली आहे. 

कोरोना आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षाच्या काळात सर्वसामान्यांचे कमालीचे नुकसान झाले आहे, त्या मुळे ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांच्यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख