राष्ट्रवादीला भरभरून देणाऱ्या सोलापूरच्या सत्तेची झोळी रिकामीच का? 

मंत्रिपदासाठी जिल्ह्याला का डावलले गेले, हे पक्षातील कार्यकर्त्यांना अजूनही उमगलेले नाही.
Solapur district, which has given four MLAs to NCP, is deprived of ministerial posts
Solapur district, which has given four MLAs to NCP, is deprived of ministerial posts

सोलापूर : अत्यंत कसोटीच्या काळात म्हणजेच सर्व वरिष्ठ नेते पक्ष सोडून गेलेले असतानाही सोलापूर जिल्ह्यातील तरुणाईने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेला उदंड प्रतिसाद दिला. तेथून राष्ट्रवादी कॉंग्रेसला विशेषतः शरद पवारांना राज्यभरातील तरुणांनी डोक्यावर घेतले. पक्षाच्या पडझडीच्या काळातही पवार यांच्यावर निष्ठा ठेवत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरने राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार आमदार दिले. मात्र, राज्यात सत्ता येऊनही मंत्रिपदाची जिल्ह्याची पाटी कोरीच राहिली आहे. मंत्रिपदासाठी जिल्ह्याला का डावलले गेले, हे पक्षातील कार्यकर्त्यांना अजूनही उमगलेले नाही. 

दरम्यान, विधान परिषदेच्या उमेदवारीबाबतही तीच गोष्ट सोलापूरच्या वाट्याला आली आहे. कारण, बीडचे संजय दौड आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीने अल्पावधीत आमदारकी बहाल केली. मात्र, पक्षाला विधानसभेत गेल्या पंधरा वर्षांपासून हक्काने आमदार देणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना अजूनही संधी मिळू शकलेली नाही. या गोष्टींचे शल्य सोलापूरकरांना लागून राहिलेले आहे. त्यामुळे आगामी काळात तरी सोलापूर जिल्ह्याला सत्तेची पदे मिळणार का?, असा सवाल विचारला जात आहे. 

आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये प्राजक्त तनपुरे आणि आदिती तटकरे राज्यमंत्री झाले. मात्र, सलग सहाव्यांदा विधानसभेला विजयी होणारे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व आमदारकीची हॅट्‌ट्रीक साधणारे (स्व.) भारत भालके यांना राष्ट्रवादीने मंत्रिपदासाठी डावलले. आमदार शिंदे यांचे तळ्यात मळ्यात होते? त्यामुळे मंत्रीपद हुकले असेल, अशीच समजूत कार्यकर्ते करुन घेत आहेत. मात्र, 2009 मध्ये हे आमदार शिंदे राष्ट्रवादीसोबत असतानाही त्यांची संधी का हुकली? त्यावेळी तर ते जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ आमदार होते.
 
आमदार भारत भालके तर कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले होते, त्यांनाही मंत्रीपदासाठी डावलण्यात आले. या प्रश्‍नांची उत्तरे सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मिळत नसल्याने राष्ट्रवादीत चालते कोणाचे? सोलापूरबद्दल पवारांच्या मनात आहे तरी काय? याची उकल होताना दिसत नाही. शरद पवारांनी ठरविले तर कोणालाही कोठूनही मंत्रीपद मिळू शकते, याचे उदाहारण नेवासेमधून (जि. नगर) अपक्ष आमदार झालेल्या शंकरराव गडाख व शिरोळमधून (जि. सांगली) अपक्ष आमदार झालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्राने पाहिले आहे. या दोन्ही अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपदाची लॉटरीच लागली आहे. 

सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीने जशी मंत्रिपदाची  हुलकावणी दिली. तशीच हुलकावणी विधान परिषदेच्या बाबतीत मिळाली. मोहोळ विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये  अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतरही 2009, 2014 व 2019 च्या निवडणुकीत मोहोळमधून नवख्या उमेदवाराला आमदार करण्याची किमया माजी आमदार राजन पाटील यांनी केली आहे. राजन पाटील यांच्या पाठीमागून आलेल्या (जिल्ह्यातील व राज्यातील) अनेकांना विधान परिषदेची लॉटरी लागली. पाटील यांना मात्र संधी मिळू शकली नाही. 

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्‍ते उमेश पाटील यांचे नाव शेवटपर्यंत स्पर्धेत होते. त्यांनाही राष्ट्रवादीने हुलकावणीच दिली. येत्या काळात तरी सोलापूरकरांना विधानपरिषद, मंत्रीपद अथवा महामंडळ मिळणार की हुलकावणीचीच सवय कायम ठेवावी लागणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

लाडक्या शिष्याच्या मैदानात पवार कोणाला उतरविणार? 

पंढरपूर-मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार (स्व.) भारत भालके यांच्या निधनाने भीमा खोऱ्यात राष्ट्रवादीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भालके कोणत्याही पक्षात असोत, त्यांचे प्रेम आणि निष्ठा मात्र शरद पवार यांच्यावरच होती. मंगळवेढ्याच्या या पोटनिवडणुकीसाठी भगीरथ भालके किंवा त्यांच्या मातोश्री, प्रशांत परिचारक किंवा उमेश परिचारक, समाधान आवताडे, अभिजीत पाटील यांच्यासह इतरही नावे चर्चेत आहेत. भालकेंच्या नंतर कोण? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी अनेक चर्चा झडू लागल्या आहेत. सुरुवातीला औदुंबरअण्णा पाटील व नंतर भारत भालके या लाडक्‍या शिष्याच्या मैदानात शरद पवार कोणाला उतरविणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com