कर्ज घेण्याची पत संपल्याने दूध संघाचा जागाविक्रीचा निर्णय - Solapur District Milk Association seeks permission to sell land in Vashi | Politics Marathi News - Sarkarnama

कर्ज घेण्याची पत संपल्याने दूध संघाचा जागाविक्रीचा निर्णय

प्रमोद बोडके
मंगळवार, 6 जुलै 2021

संघावर 44 कोटी 71 लाख 89 हजार 934 कर्ज व देणी आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून या संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. दूध संघाच्या मालकीची वाशी, नवी मुंबई मधील 1016 चौरस मीटर जागा, इमारत व सर्व मिशनरीसह विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी दूध संघाच्या प्रभारी कार्यकारी संचालकांनी विभागीय दुग्ध उपनिबंधकांकडे केली आहे. (Solapur District Milk Association seeks permission to sell land in Vashi)

दरम्यान, सोलापूर जिल्हा दूध संघाची नवीन कर्ज घेण्याची पत संपली आहे. त्यामुळे मालमत्ता विक्री करण्याशिवाय सध्या कोणताही पर्याय नाही, असे सोलापूर जिल्हा दूध संघाचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी सांगितले.

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ऐकायचे नसते तर आधीच करेक्ट कार्यक्रम केला असता...

आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या जिल्हा दूध संघाच्या मालमत्ता विक्रीचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वी 29 जुलै 2019 रोजी संचालक मंडळाच्या सभेमध्ये जागा विक्री बाबत सविस्तर चर्चा झाली होती व जागा विक्रीचा निर्णय झाला होता. या निर्णयाला विभागीय दुग्ध उपनिबंधकांनी सुरुवातीला मान्यता दिली होती व त्यानंतर 31 जानेवारी 2020 रोजी जागा विक्रीला स्थगिती दिली होती.

सद्यस्थितीत उत्पादकांची दूध बिले, वाहतूक ठेकेदारांची बिले, पुरवठादाराची बिले, शासकीय देणे, कर्जावरील व्याज, कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित आणण्यासाठी दूध संघाला खेळत्या भांडवलाची आवश्यकता आहे. त्यामुळे जागा विक्रीची परवानगी मागण्यात आली आहे. ता. 31 मार्च 2021 अखेर सोलापूर संघावर 44 कोटी 71 लाख 89 हजार 934 कर्ज व देणी आहेत. त्यामुळे जागा विक्रीला परवानगी मागण्यात आली आहे. 

प्रशासक मंडळ धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही : माने

दूध संघाच्या जागा विक्रीचा विषय यापूर्वी आला होता. या विषयाला स्थगिती मिळविण्यात आली आहे. दूध संघावरील प्रशासक मंडळ धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. जागा विक्रीच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे, असा संशय सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीप माने यांनी व्यक्त केला. 

संघाला महिन्याला २५ लाख रुपये व्याज भरावे लागते : पांढरे

सोलापूर जिल्हा दूध संघावर जवळपास साडे सव्वीस कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाच्या व्याजापोटी दूध संघ दर महिन्याला 25 लाख रुपयांचे व्याज भरत आहे. दूध संघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन कर्ज काढणे किंवा मालमत्ता विक्री करणे हाच पर्याय आहे. दूध संघाला नवीन कर्ज घेण्याची पत संपली आहे. त्यामुळे मालमत्ता विक्री करण्याशिवाय सध्या पर्याय नाही, असे सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख