...म्हणून मी मराठा समाजाची बाजू घेतोय : संभाजीराजे 

जो समाज वंचित आहे, मागासलेला आहे, त्याला कायम आपल्यावर अन्याय होतो, असे वाटणार आणि जाती-जातीत तेढ निर्माण होणार.
... So I am taking the side of the Maratha community: Sambhaji Raje
... So I am taking the side of the Maratha community: Sambhaji Raje

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती आणि बारा बलुतेदारांना न्याय दिला असताना तुम्ही त्यांचे वशंज असूनही फक्त मराठा समाजाची बाजू का घेता? असा प्रश्‍न विचारणाऱ्यांना खासदार संभाजीराजे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. राजकारणविरहित सामाजिक एकोप्यासाठी माझे प्रयत्न आहेत. ते मी शेवटपर्यंत करत राहणार. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून माझे ते कर्तव्यच आहे. म्हणून मी अन्यायग्रस्त मराठा समाजाची बाजू घेणारच, या शब्दांत संभाजीराजे यांनी फेसबुकद्वारे टिकाकारांना उत्तर दिले आहे. 

तुम्ही केवळ मराठा समाजाची बाजू घेत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना न्याय दिला. शिवरायांचे वंशज राजर्षी शाहू महाराजांनी सर्व जातींच्या बहुजनांचा उद्धार केला. तुम्ही त्या महापुरुषांचे वंशज आहात, मग तुमची अशी भूमिका का? असा प्रश्न संभाजीराजे यांना सोशल मीडियावर विचारला होता. 

फेसबुक पोस्टवर संभाजीराजे म्हणाले, "शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारले. त्यावेळी परकीयांनी इथल्या भूमिपुत्रांवर जुलूम सुरू ठेवला होता. त्यामुळे महाराजांनी सर्वांमध्ये स्वाभिमान चेतवला. ज्याची जशी योग्यता तशी जबाबदारी त्या व्यक्तींवर सोपवली. हे करत असताना कोण उच्च जातीतला, कोण कनिष्ठ जातीतला हा भेद केला नाही. सर्वांना सोबत घेतले. विसाव्या शतकात राजर्षी शाहू महाराजांना लक्षात आले, की जाती विषमतेमुळे समाज खूप मागासला गेला आहे. सर्वदूर अज्ञानाचा काळोख आणि गरिबीमध्ये हा बहुजन समाज अडकून पडलेला आहे. तेव्हा महाराजांनी आपल्या राज्यात आरक्षणाची व्यवस्था आणली.' 

देशात पहिल्यांदा शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण लागू केले. तेव्हा अनेक समाजांना आधुनिक शिक्षण घेणं दुरापास्त होते. सरकारी नोकरी तर दूरचा विषय. आज आपण जे आरक्षण बघतोय, ती राजर्षी शाहू महाराजांची देणगी आहे. डॉ. बाबासाहेबांनी हेच आरक्षण पुढे संविधानात ठेवले. राजर्षी शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होतं, त्यात मराठा समाजाचा समावेश होता. आज आरक्षणापासून हा समाज दूर आहे. कोण कुठल्या जातींत जन्माला आला; म्हणून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसतो. प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेप्रमाणे समान संधी मिळाली पाहिजे. आजच्या कायद्यानुसार जे आरक्षण मिळतं त्यात गरीब मराठ्यांना संधी मिळत नाही, असेही त्यात म्हटले आहे. 

संभाजीराजे म्हणतात की राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात आरक्षणाचा कायदा लागू केला, तो सर्व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. म्हणजे जो समाज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची ती उपाय योजना आहे. आज मराठा समाज मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकला गेला असल्याने त्याला खरी आरक्षणाची गरज आहे. 

दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जाती विषमता कमी करण्यासाठी आरक्षणाचा फार मोठा उपयोग होतो. नाहीतर जो समाज वंचित आहे, मागासलेला आहे, त्याला कायम आपल्यावर अन्याय होतो, असे वाटणार आणि जाती-जातीत तेढ निर्माण होणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात आणि नंतरही विशिष्ट समाजांमध्ये ही भावना होती. आज तीच भावना मराठा समाजामध्ये आहे. या पेक्षा आरक्षणाच्या आधारे सर्वांना समान संधी देणे, हे राज्यकर्ते म्हणून सरकारचे कर्तव्य आहे, असेही फेसबुकवर संभाजीराजे यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com