कंगना...तू उखाड म्हटली आणि पालिकेनं उखडलं : आढळराव

मुंबईने तिला नाव दिले, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मान मिळवून दिला, त्या मुंबईची तुलना तिने पाकव्याप्त काश्‍मीरशी केली.
Shivajirao Adhalrao Patil's criticism of Kangana and Madan Sharma
Shivajirao Adhalrao Patil's criticism of Kangana and Madan Sharma

पुणे : कंगना रनौट आणि शिवसेनेचे युद्ध संपत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने जरी या विषयावर बोलण्यास प्रवक्‍त्यांना बंदी घातली असली तरी, शिवसैनिक आणि नेते मात्र कंगनावर तोंडसुख घेत आहेत.

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तर कंगनाला आमची वृत्ती वाघाची असून आमच्या नादाला लागू नका, असा इशारा दिला आहे. "तू उखाड म्हटली आणि पालिकेनं उखडलं...मुंबई महापालिकेनं करून दाखवलं. इथं चुकीला माफी नाही...फटके तर पडणारच,' असा टोलाही आढळराव यांनी लगावला आहे. 

"कृतघ्नतेचा आजार जडलेली कंगना' या फेसबुक पोस्टमध्ये आढळराव म्हणतात, जगात कृतघ्न लोकांची अजिबात कमतरता नाही. हा आजार कोरोनापेक्षा महाभयंकर आणि घातक आहे. कृतघ्न या आजाराचं मुख्य लक्षण म्हणजे आपल्याला ज्या व्यक्ती, संस्था, संघटना किंवा शहरानं नाव दिलं, संपत्ती, प्रसिद्धी, मानमरातब मिळवून दिला, लोकप्रियता दिली त्यांचे उपकार आपण विसरतो.

आपण सेल्फमेड आहोत, असं वाटायला लागतं. अधूनमधून वेड्यासारखी वक्तव्ये करण्याची हुक्की येते. मानसिक आजार असल्यासारखी वर्तणूक व्हायला लागते. कृतघ्नतेचा आजार असलेल्या व्यक्तीला असंबद्ध बडबड करण्याची सवय जडते आणि मीडिया टीआरपीसाठी अशा बेताल बडबड्यांना प्रसिद्धी देतो. 

कृतघ्नतेचा विकार जडलेल्या एका व्यक्तीची आपल्याला नुकतीच नव्याने ओळख झाली. वास्तविक मला स्वतःला "क्वीन, तनू वेड्‌स मनू' या चित्रपटातून उत्कृष्ट कलाकार म्हणून भावलेली ही अभिनेत्री, तीन राष्ट्रीय पुरस्कार जिच्या नावावर आहेत, अशी अभिनेत्री म्हणून आपल्याला या व्यक्तीची ओळख होती. मात्र, नुकत्याच घडलेल्या घटना आणि वक्तव्यांमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील सभ्य, सुसंस्कृत आणि शालीनतेचा मुखवटा उतरला नी एका क्षणात असभ्य, असंस्कृत आणि बालीश बडबड करणाऱ्या कृतघ्न व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडले.

"जिस थाली में खाना उसी में छेद करना...म्हणजे आपल्यावर उपकार करणाऱ्याचे नुकसान होईल, त्याला फटका बसेल, अशा पद्धतीने वर्तन करायचे. कंगनाने तरी दुसरे काय केले ? कृतघ्नतेसाठी आणि नालायकपणासाठी सर्वाधिक मोठा पुरस्कार द्यायचा झाला, तर तो कंगनालाच द्यावा लागेल. 

आपल्या घरातून पळून महाराष्ट्रात नशीब आजमाविण्यासाठी आलेल्या कंगनाला मुंबईने सामावून घेतले. त्याच मुंबईबद्दल ही बाई कृतघ्नतेचा सूर आळवतेय. मुंबईने तिला नाव दिले, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मान मिळवून दिला, त्या मुंबईची तुलना तिने पाकव्याप्त काश्‍मीरशी केली.

अग बये, तू जर पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये असतीस तर तुला अभिनेत्री बनण्याची संधी मिळणं सोड, अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची संधी तरी मिळाली असती का? याचा विचार कर. तुझी जीभ हासडून टाकली असती किंवा गायब करून तुझी हत्याही करण्यात आली असती. मुंबईत आहेस; म्हणून सुरक्षित आहेस, इतकं लक्षात ठेव. 

टीव्हीवर बोलताना आणि सोशल मीडियावर व्यक्त होताना आज झाशीची राणी आणि शिवाजी महाराजांचं नाव घेणारी ही बया कधीकाळी व्याभिचारी नि अमली पदार्थांचं सेवन करणारी होती, हे विसरता येणार नाही, त्यामुळे या महान व्यक्तिमत्त्वांचं नाव घेण्याचीही तिची लायकी नाही, हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं, असे आढळराव म्हणतात. 

नशेत बोलते की काय समजायला मार्ग नाही. पण काय म्हणते ही बया तर, "तुम्हास महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीचा इतका अभिमान आहे आणि इतक्‍या बढाया मारता तर मराठी भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांवर एक तरी चांगला चित्रपट झालाय का ? अगं बये..., तुला माहिती नाही पण भालजी पेंढारकर नावाचे एक महान दिग्दर्शक मराठीत होऊन गेले. त्यांची हयात गेली ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यात. त्यांनी छत्रपती शिवरायांवर केलेले चित्रपट बघ आणि मग बोल. महेश मांजरेकरनं मध्यंतरी केलेला चित्रपट बघितला तरी तुला कळेल महाराष्ट्रातील दिग्दर्शकांची ताकद काय आहे...काहीही माहिती न घेता बोलणं याला आमच्या मराठीत "उचलली जीभ लावली टाळ्याला', असे म्हणतात. 

शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला पक्ष आहे. त्या वेळी बाळासाहेबांसोबत मॉंसाहेब, तर सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत रश्‍मीवाहिनी यांनी "महिला आघाडी'च्या मार्फत सदैव महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले आहे. स्रियांचा सन्मान करण्याची आमची संस्कृती आहे. तू मात्र जिभेवरील नियंत्रण घालवून परवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. अरे तुरे म्हणून त्यांना अवमानकारक बोललीस.

हिमाचल प्रदेशातून मोठ्या तोऱ्यात बाईट दिलास की, "मी नऊ सप्टेंबरला मुंबईत येते आहे. काय उखाडायचं आहे ते उखाडा.' आता मुंबई महापालिकेनं तुझ्या ऑफिसचं अनधिकृत बांधकाम उखडलं, तर तुला इतकं चिडायला काय झालं...तू उखाड म्हटली आणि पालिकेनं उखडलं. काय चुकलं. मुंबई महापालिकेनं करून दाखवलं आणि त्याचा संबंध महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी जोड्‌ण्याचं काय कारण, असा सवाल आढळराव यांनी विचारला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख तू एकेरी पद्धतीने करते, यातच तुझे संस्कार आणि प्रवृत्ती दिसते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी तुझ्या वक्तव्याला काडीचीही किंमत दिली नाही. उद्धवसाहेब काही बोलणार नाहीत, पण शिवसैनिक तुझी मस्ती उतरवायला मागेपुढे पाहणार नाहीत. आज तुझं ऑफिस तोडलंय. त्यातून काय समजायचं ते समजून घे. उद्या काय करतील आणि कसा धडा शिकवतील, याचा तुला अंदाजही येणार नाही. 

तिकडे मदन शर्मा नावाचा कोणीतरी एक निवृत्त नौदल अधिकारी मुख्यमंत्र्याचं आक्षेपार्ह व्यंग्यचित्र प्रसिद्ध करतो आणि मग फटके खातो. व्यंग्यचित्रात काय दाखवलं आहे, हे पाहिल्यानंतर शिवसैनिक का चिडले, याचा अंदाज आपल्याला येईल. एखाद्याचे आई-बाप बदलून दाखविणं हे कसलं व्यंग्यचित्र. हे तर विकृतचित्र. असं व्यंगचित्र काढणाऱ्याला आणि ते आक्षेपार्ह कॉमेंटसह प्रसिद्ध करणाऱ्याला फटकाविणार नाही तर काय करणार...शर्माच्या समर्थनार्थ पुढे येणाऱ्यांचे आई-बाप बदलले आणि त्याचं चित्र काढलं तर चालेल का, हे आधी स्पष्ट व्हायला हवं. 

"नौदलात इतकी वर्षे राहून ज्याला सार्वजनिकपणे काय शेअर करावं आणि काय करू नये, हे समजत नाही, त्याबद्दल न बोललेलंच बरं. चूक स्वतः करायची आणि फटके पडले की नौदलाची ढाल पुढे करायची. हे धंदे बंद करा आणि एक लक्षात ठेवा ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. इथं चुकीला माफी नाही. फटके तर पडणारच. स्वतः चूक करायची आणि फटके पडले की शिवसेनेच्या नावानं रडायचं, हा धंदा बंद करा, असेही आढळराव यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com