आढळरावांनी आतापासूनच सुरू केली आगामी लोकसभा लढविण्याची तयारी  - Shivajirao Adhalrao Patil started preparations to contest the upcoming Lok Sabha elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

आढळरावांनी आतापासूनच सुरू केली आगामी लोकसभा लढविण्याची तयारी 

नितीन बारवकर
शनिवार, 19 जून 2021

गेल्या लोकसभा निवडणुकीत  जे चुकले ते मान्य करून आता दुरूस्तीवर भर देत पुन्हा संपर्क सुरू केला आहे.

शिरूर (जि. पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे ठेवायची की राज्याच्या सत्तेतील मित्रपक्षाला द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. तथापि, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मला व शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाहीत, असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर येथे व्यक्त केला. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या वावड्या उठविण्यात विरोधकांचा हात असून, पुढील लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मी तयारी करीत आहे, असेही सांगितले. (Shivajirao Adhalrao Patil started preparations to contest the upcoming Lok Sabha elections)

दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे सांगून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे. 

जनतेशी संपर्क, कार्यकर्त्यांशी चर्चा याबाबत काही त्रुटी राहिल्या असतील म्हणूनच गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. निवडणुकीत जे चुकले ते मान्य करून आता दुरूस्तीवर भर देत पुन्हा संपर्क सुरू केला आहे, असेही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा : सुनील शेळकेंची ती मागणी मान्य करत बाळा भेगडेंनी उलटवला डाव!

आढळराव पाटील म्हणाले, ‘‘सध्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग योग्य रीतीने करीत असून, लोकांशी वैयक्तिक भेटीगाठी व संपर्क साधण्यावर भर दिला आहे. जनतेची कामे समजून घेऊन ती मार्गी लावण्यासाठीचा पाठपुरावा चालू आहे. संपर्कातून आनंद व समाधान मिळत असून, वेळ सार्थकी लागत आहे. पक्षबांधणी नव्याने करताना जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संच सज्ज करीत आहे. कार्यकर्त्यांबरोबरच; सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन समस्या समजून घेत आहे, संवाद वाढवत आहे.’’ 

‘‘भविष्यात शिरूरची जागा मित्रपक्षाला गेली तरी पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य असेल. तथापि, हा मतदार संघ गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात होता, त्याचीही दखल घेतली जाईल. शिवसेनेलाही शिरूर मतदार संघात तेवढीच संधी आहे. शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, याचा विश्‍वास आहे,'' असे आढळराव पाटील यांनी नमूद केले.

भाजप प्रवेशाबाबत हितशत्रू कायमच वावड्या उठवीत असतात. मी सच्चा शिवसैनिक असून, पक्षाने एक-दोनदा नव्हे; चार वेळा उमेदवारी दिली आहे. पराभव होऊनही उपनेतेपद दिले. खासदार नसतानाही शिवसेनेत मला मान-सन्मान आहे. सांगितलेली विकासकामे प्राधान्याने मार्गी लावली जातात. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावभेट दौरे करण्याविषयी सांगितले आहे. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्‍वास आहे. शिवसेनेने कधीही माझ्यावर अन्याय केलेला नाही, त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असेही आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख