परिचारक, पाटील, जाधव कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवार उद्या पंढरपूर दौऱ्यावर 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता. 29 सप्टेंबर) पंढरपुरात येणार आहेत.
Sharad Pawar to visit Pandharpur tomorrow
Sharad Pawar to visit Pandharpur tomorrow

पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मंगळवारी (ता.29 सप्टेंबर) पंढरपुरात येणार आहेत. सहकारातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांच्या कोरोना निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची पवार सांत्वनपर भेट घेणार आहेत. 

माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे राष्ट्रवादी आणि पवार घराण्याचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेवेळी (कै.) परिचारकांनी पवारांना जिल्ह्यातून मोठी ताकद निर्माण करून दिली होती. पवारांनीही परिचारकांवर एसटी महामंडळाच्या रूपाने मोठी जबाबदारी दिली होती. साखर कारखान्यांच्या माध्यमातून पवार यांनी परिचारकांना नेहमीच मदत केली. 

परिचारक आणि पवार यांचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध होते. सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत (कै.) परिचारकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती. तरीही शरद पवारांनी परिचारकांच्या विरोधात थेट टीका टिप्पणी करण्याचे आवर्जून टाळले होते. 

परिचारकांच्या निधनापूर्वी काही दिवस शरद पवारांचे घनिष्ठ (कै.) यशवंतभाऊ पाटील यांचे पुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले. (कै.) पाटील हे शेवटपर्यंत राष्ट्रवादीशी आणि पवारांच्या विचारांशी प्रमाणिक राहिले होते. 

अलीकडेच संत कैकाडी महाराजांचे पुतणे प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांचेही कोरोनामुळे निधन झाले. (कै) रामदास महाराज आणि शरद पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अगदी जवळचे संबंध होते. रामदास महाराजांच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांना शरद पवारांनी हजेरी लावली होती. 

अलीकडच्या काही दिवसांत कोरोनाच्या साथीमुळे पंढरपूर तालुक्‍यातील राजकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचे शरद पवारांशी नेहमीच जवळचे संबंध राहिले होते. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार उद्या पंढरपुरात येणार आहेत. 

शरद पवार हे मंगळवारी (ता. 29 सप्टेंबर) सकाळी भोसे येथे पाटील कुटुंबीयांची भेट घेवून दुपारी दीड वाजता परिचारक यांच्या वाड्यावर जाणार आहेत. त्या ठिकाणी ते परिचारक कुटुंबाचे सांत्वन करणार आहेत. त्यानंतर कैकाडी महाराज मठात जाऊन जाधव कुटुंबीयांना भेटणार आहेत.

त्यानंतर आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबून नंतर ते मोटारीने पुण्याकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com