शरद पवारांनी जपले तिसऱ्या पिढीशीही ऋणानुबंध  - Sharad Pawar also maintains a bond with the third generation | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांनी जपले तिसऱ्या पिढीशीही ऋणानुबंध 

प्रमोद बोडके 
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली आणि सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांनी भोसे (ता. पंढरपूर) येथील यशवंतभाऊ पाटील यांच्यावर सोपविली.

सोलापूर : राज्याच्या राजकारणात सोलापूरचे महत्व कायमच अबाधित राहिले आहे. सन 2009 ते 2014 या कालावधीत यूपीए सरकारमधील केंद्रीय गृहमंत्रिपद सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे होते, तर त्याच कालावधीत देशाचे कृषिमंत्रीपद माढ्याचे तत्कालीन खासदार शरद पवार यांच्याकडे होते.

एकाच जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी राजकीय किमयाही राज्यात फक्त सोलापूर जिल्ह्यानेच सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निमित्ताने करून दाखविली आहे. त्याच सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अनेक जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत. त्यातीलच एका कार्यकर्त्यासोबतची नाळ शरद पवारांनी आज पुन्हा एकदा घट्ट केली आहे. 

पवारांच्या आयुष्यातील पहिले पालकमंत्रिपद सोलापूर जिल्ह्याचे असल्याने पवारांच्या आयुष्यात सोलापूर आणि सोलापूरचे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण यात पवार या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. सोलापूर जिल्ह्यातील अनेक घराण्यांतील तिसऱ्या पिढीसोबतही शरद पवारांनी नाळ कायम राखली आहे, हे विशेष.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली आणि सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांनी भोसे (ता. पंढरपूर) येथील यशवंतभाऊ पाटील यांच्यावर सोपविली. नंतरच्या काळात जिल्हा राष्ट्रवादीची धुरा अनेकांकडे गेली; परंतु पाटील आणि पवार परिवारातील ऋणानुबंध अद्यापपर्यंतही कायम राहिला. 

यशवंतभाऊ यांच्यानंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची धुरा यशवंतभाऊ यांचे चिरंजीव राजूबापू पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का सर्वांनाच बसला.

कोरोनाच्या संकटातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसे येथे येऊन पाटील परिवाराचे सांत्वन केले. पाटील कुटुंबीयांची दोन पिढ्यांची निष्ठा कायम लक्षात राहील, असा शब्दही त्यांनी दिला होता. 

याच पाटील परिवारातील तिसऱ्या पिढीतील सदस्य भोसे गावचे उपसरपंच ऍड. गणेश पाटील यांच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांना मुंबईत नियुक्तीपत्र देण्यात आले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष (कै.) राजूबापू पाटील यांचे गणेश पाटील हे चिरंजीव आहेत. त्यांच्या या निवडीतून राष्ट्रवादीने पवार व पाटील परिवाराच्या ऋणानुबंधाला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सच्चा कार्यकर्त्यांसोबत नेहमी असते, असा मेसेज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांनी या निवडीतून दिला आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख