सरपंचाच्या मुलाने केला एकावर खुनी हल्ला; मंगळवेढ्यातील घटना - Sarpanch Son Attacks one with Sword | Politics Marathi News - Sarkarnama

सरपंचाच्या मुलाने केला एकावर खुनी हल्ला; मंगळवेढ्यातील घटना

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन फिर्यादी राम बाबासाहेब ओलेकर (रा सलगर खुर्द) यांना शिविगाळ करत हातातील तलवार डोक्यात मारल्याप्रकरणी सलगर खुर्दच्या सरपंचचाचे सुपूत्र विठ्ठल शामराव सरगर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सलगर बुद्रुक (मंगळवेढा) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन फिर्यादी राम बाबासाहेब ओलेकर (रा सलगर खुर्द) यांना शिविगाळ करत हातातील तलवार डोक्यात मारल्याप्रकरणी सलगर खुर्दच्या सरपंचचाचे सुपूत्र विठ्ठल शामराव सरगर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दत्ता शामराव सरगर, विद्यमान सरपंच सुरावंती शामराव सरगर, गजेंद्र वसंत सरगर, गौतम बंडगर, सचिन मासाळ (सर्व रा.सलगर खुर्द ता. मंगळवेढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना काल सकाळी ८.३० च्या सुमारास सलगर खुर्द येथे घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल (२५ ऑक्टोबर) सकाळी ८.३० च्या सुमारास सलगर खुर्द येथील फिर्यादीची बहिण मिराबाई धुळाप्पा करपे हिच्या घरासमोर मिराबाई करपे व भाऊसाहेब लेंगरे यांच्यामध्ये सांडपाण्याच्या कारणावरून भांडणे सुरु होती. त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा तानाजी बहिण, भाचा असे समजावून सांगत असलाना सरपंच पुत्र विठ्ठल शामराव सरगर याने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन त्यांना शिविगाळ केली. त्याने हातातील तलवारीने तू विरोधी गटाचे काम करतो. इथे कशाला आला तुला दसरा सण बघू देत नाही, असे म्हणुन फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. 

तसेच त्याच्या सोबतच्या लोकांनी त्याच्या हातातील काठीने फिर्यादीची बहिण मिराबाई भाचा सुरेश व मुकेश यांना मारहाण केली आहे.  फिर्यादीचा मुलगा तानाजी हा भांडणाची शुटींग करीत असताना दुसरा सरपंच पुत्र दत्ता शामराव सरगर याने हातात तलवार घेवुन त्याचा पाठलाग केला. दरम्यान सर्वांनी फिर्यादीच्या बहिणीच्या घरावर दगडफेक करुन फिर्यादीच्या मोटार सायकलची मोडतोड करुन नुकसान केले आहे. 

याप्रकरणी सरपंच पुत्र विठ्ठल शामराव सरगर व दत्ता शामराव सरगर, सुरावंती शामराव सरगर, गजेंद्र वसंत सरगर,गौतम बंडगर, सचिन मासाळ (सर्व रा.सलगर खुर्द ता. मंगळवेढा) यांच्याविरोधातगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके हे करीत आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख