भालकेंचे पुंडलिक वरदे ऽऽ...तर आवताडेंनी घेतले विधानसभेच्या पायरीचे दर्शन  - Samadhan Avtade took the first darshan of the assembly's stair | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

भालकेंचे पुंडलिक वरदे ऽऽ...तर आवताडेंनी घेतले विधानसभेच्या पायरीचे दर्शन 

हुकूम मुलाणी
गुरुवार, 13 मे 2021

आवताडे यांनी श्री पांडुरंग व संत दामाजीपंतांना स्मरून आमदारकीची शपथ घेतली आहे. 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : वारकरी संप्रदायात पांडुरंगाच्या दर्शनापूर्वी नामदेव पायरीच्या दर्शनाची परंपरा आहे. पंढरपूरची हीच वारकरी परंपरा या भागाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Avtade) यांनी जपली आहे. विधानसभा निवडणुकीतील दोन पराभव पचवून तिसऱ्या प्रयत्नांत आमदार झालेले आवताडे यांनी विधानसभेच्या पायरीचे दर्शन घेऊनच राज्याचे विकास मंदिर असलेल्या विधानसभेत प्रवेश केला. हीच परंपरा आवताडे यांच्या अगोदरचे आमदार भारत भालके (MLA Bharat Bhalke) यांनी पाळत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर विठुनामाचा गजर करत ‘बोला ऽ पुंडलिकऽऽ वरदेऽऽऽ हरी विठ्ठलऽऽऽऽ असा जयघोष केला होता. (Samadhan Avtade took the first darshan of the assembly's stair)

पंढरपूर पोटनिडणुकीत विजयी झालेल्या समाधान आवताडे यांनी बुधवारी (ता. १२ मे) विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी विधानसभेच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बाळा भेगडे हे देखील होते. 

हेही वाचा : आमदार भीमराव तापकीर यांनी तक्रार केलेल्या तहसीलदारची बदली

मतदार संघ पुनर्रचनेनंतर मंगळवेढा मतदारसंघाचे अस्तित्व संपून हा मतदारसंघ पंढरपूरशी जोडण्यात आलेला आहे. या मतदारसंघातून बदललेल्या समीकरणातून पहिल्यांदा आमदार होण्याची संधी (स्व.) भारत भालके यांना मिळाली. त्यांनी प्रथम विधानसभेची शपथ घेताना विठुनामाचा गजर विधीमंडळात केला होता आणि शेवट बोलाऽ पुंडलिक वरदेऽऽ हरी विठ्ठल ऽऽऽ असा जयघोष केला होता. त्याच पद्धतीने पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आवताडे यांनी श्री पांडुरंग व संत दामाजीपंतांना स्मरून आमदारकीची शपथ घेतली आहे. 

पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. यापूर्वीच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत जवळपास 40 हजार इतकी मते घेतली होती, तर 2019 मध्ये अपक्ष लढवत पंचावन्न हजार इतकी मते घेतली होती. मात्र, पोटनिवडणुकीत त्यांनी एक लाख नऊ हजार इतकी मते भाजपकडून उभा राहून घेत विजय संपादन केला होता. 

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या समाधान आवताडे यांनी एस. एम. आवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील काही बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या कंपनीच्या माध्यमातून महामार्गाची कामे करत त्यांनी या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांचे बंधू संजय आवताडे यांचे व्यवसायाबरोबरच पोटनिवडणुकीतील विजयामध्येही मोठे योगदान ठरले आहे. आवताडे स्पिनिंग मिलच्या माध्यमातून त्यांनी ही महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विधिमंडळातील प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले आवताडे यांचा अखेर विधानसभेत प्रवेश झाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख