प्रसिद्ध कीर्तनकार, समाजसुधारक रामदास महाराज कैकाडी यांचे निधन - ramdas kaikadi maharaj dies due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

प्रसिद्ध कीर्तनकार, समाजसुधारक रामदास महाराज कैकाडी यांचे निधन

भारत नागणे
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची नितांत श्रध्दा होती. संत गाडगेबाबा आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी याविषयी ते आपल्या किर्तनातून परखडपणे मत मांडत असत.

पंढरपूर : संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त प्रसिद्ध कीर्तनकार हभप रामदास महाराज कैकाडी ( जाधव) (वय 77)  यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 25) दुपारी  त्यांचे निधन झाले. मनमाड हे त्यांचे मूळ गाव होते. वारकरी संप्रदायामध्ये त्यांना मानाचे स्थान होते. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची नितांत श्रध्दा होती. संत गाडगेबाबा आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी याविषयी ते आपल्या किर्तनातून परखडपणे मत मांडत असत. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी तळमळीने काम केले. संत तुकाराम महाराज बिजेच्यानिमित्ताने देहू ते पंढरपूर अशी  विठ्ठल पालखी रथ सोहळ्याची  परंपरा देखील त्यांनीच सुरु केली होती. 

 
येथील विश्व पुण्यधाम  मधून जगाला अध्यात्म, विज्ञान आणि शांतीचा संदेश दिला आहे.  सामाजिक समतेच्या विचारावर उभारलेल्या येथील विश्व पुण्यधामाला देशभरातील अनेक विठ्ठल भक्त,पर्यटक आणि विचारवंतांनी भेट दिली आहे. 
त्यांनी आपल्या किर्तनातून अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी, प्रथा आणि परंपरा विषयी  जनजागृती केली. संत गाडगेबाबा आणि संत तुकाराम महाराजांची विचारधारा त्यांनी अधिक लोकापर्यंत पोचवली. हे काम करत असताना त्यांना अनेकवेळा वारकरी संप्रदायातील काही तथाकथित महाराज मंडळींकडून अवहेलना देखील सहन करावी लागली.

त्यांचे वारकरी संप्रदायातील स्थान लक्षात घेवून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर अध्यक्ष म्हणून निवड केली होती. परंतु समितीचे अध्यक्षपद हे त्यांच्यासाठी औट घटकेचे ठरले होते.   गरीब, अपंग,कुष्ठरोगी, आणि निराधार लोकांच्या सेवेसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या मठामध्ये आजही अन्नदान सेवा सुरु आहे. त्यांनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदर समितीचे अनेक वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख