अशोक पवारांबाबतच्या पोस्टने शिवसेनेत वाद पेटला; जिल्हाप्रमुखांविरोधात काहींचे बंड  

उद्याच्या बैठकीत काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना थेट नारळ मिळण्याचे संकेत आहेत.
Post praising Ashok Pawar became the cause of controversy in Shiv Sena
Post praising Ashok Pawar became the cause of controversy in Shiv Sena

शिक्रापूर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवारांच्या कौतुकाच्या त्या संदेशामुळे शिवसेनेत सध्या मोठे वादंग उठले आहे. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील रविवारच्या (ता. १२ सप्टेंबर) बैठकीत नेमका काय तोडगा काढतात, याची उत्सुकता शिरुर-हवेली मतदारसंघाला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्या विरोधातही काहींनी बंड उभारायला सुरुवात केली असून उद्याच्या बैठकीत काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना थेट नारळ मिळण्याचे संकेत आहेत. या बैठकीतील निर्णय परिणाम आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांवरही होणार आहेत. (Post praising Ashok Pawar became the cause of controversy in Shiv Sena)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत पाच सप्टेंबर रोजी शिक्रापुरात (ता. शिरूर) येऊन गेले. त्यानंतर शिरुर-हवेली शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या मेळाव्यानंतर उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार व शिवसेनेचे जिल्हा सल्लागार अनिल काशिद यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. जातीवाचक बोलणे, भुरटे म्हणणे, लोक जमविण्यासाठी जात आडवी येत असल्याची टीकाटिप्पणी करणे, ही या वादाची वरकरणी कारणे सांगितली जात आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्याबद्दल शिवसेनेतील काहींची जवळीक असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. कारण या दोघांनी विद्यमान तालुकाध्यक्ष सुधीर फराटे व जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांची नावे तेव्हाच घेतली जेव्हा त्यांना वरील अनुभव आले. नारायण राणेंच्या विरोधातील आंदोलनाबद्दल फराटे-कटके यांनी आक्षेप नोंदविल्यानेही शेलार-काशिद दुखावले आहेत. 
 
हेही वाचा : राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के : शहराध्यक्षांपाठोपाठ विविध सेलच्या १२ प्रमुखांचे राजीनामे

शिवसेना शिरूर-हवेली या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अधिकृत ग्रुपवर अनिल काशिद यांनी अशोक पवार यांच्या कौतुकाचा जो मेसेज टाकला, त्याचा संदर्भ देत सुधीर फराटे यांनी सांगितले की, मी तालुकाध्यक्ष झाल्यानंतरच शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू म्हणून मी राष्ट्रवादीविरोधात भूमिका जाहीरपणे घेत आहे. यापूर्वी असे काही होत नव्हते. अनेक कार्यक्रमांमध्ये आमचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांनाच स्थान नसायचे, तरीही सर्वकाही आलबेल होते. 

भाजपच्या माजी आमदारांना मान; पण आढळरावांना नाही

सोशल मीडियावर तालुकाध्यक्ष फराटे यांनी थेट ५ सप्टेंबर २०२१ मध्ये शिरुर नगर परिषदेच्या एका वास्तूदर्शन समारंभाची एक कोनशिला शेअर करत त्यात आमदार अशोक पवार, यांच्याबरोबरच भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचा उल्लेख आहे. शिरूर आणि राज्यात महाआघाडीत राष्ट्रवादीसोबत शिवसेना असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्या कार्यक्रमात स्थान न  मिळणे, ही गंभीर बाब आहे. काही जुन्या शिवसैनिकांची अशोक पवारांशी कशी सेटींग आहे, याबाबत आक्षेप घेत काशिद यांची पोस्ट त्याचाच भाग असल्याचे दाखवून दिले. घोडगंगा कारखान्याविरोधातील आंदोलनाच्या भूमिकेला जे शिवसैनिक उघड बगल देतात, त्यांच्याबद्दलही तालुकाध्यक्ष फराटे यांनी आक्षेप नोंदविले आहेत.  

वैयक्तीक वादात शिवसेनेला ओढले जात आहे : काशिद

अशोक पवार हे आम्हा शिवसैनिकांसोबत महाआघाडीचा धर्म पाळून प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाचे स्थान देतात.  कोरेगाव भीमा परिसरात काही ठिकाणी तर आम्हाला विचारुन विकासकामे मंजूर करुन निधी दिल्याची उदाहरणे आहेत. आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार म्हणून तालुक्याच्या राजकीय पातळीवर कुठलीच तक्रार नाही. जे वाद आहेत, ते वैयक्तिक स्वरुपाचे असून शिवसेना पक्षाला त्यात ओढले जात आहे.  

शिवसेनेचा बडा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर

जुन्नरमधील जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. त्यानंतर पुणे जिल्हा शिवसेनेत मोठ्या घडामोडी सुरू आहेत. जिल्ह्यातील एक बडा पदाधिकारी लवकरच भाजपत जाण्याची चर्चा होती. मात्र, हा पदाधिकारी आता राष्ट्रवादीत जाईल, अशी शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून समजते. त्यामुळे शिवसेना उपनेते आढळराव पाटील आता काय भूमिका घेतात, यावरच शिवसेनेचे भवितव्य ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com