जिल्हा परिषद सदस्य बंडखोरी : मोहिते-पाटील गटाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का  - The petition of the rebel members of Solapur Zilla Parishad was rejected by the Supreme Court | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा परिषद सदस्य बंडखोरी : मोहिते-पाटील गटाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का 

प्रमोद बोडके  
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करणाऱ्या मोहिते-पाटील गटाच्या सहा बंडखोर सदस्यांची सुनावणी आता जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणार आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करणाऱ्या मोहिते-पाटील गटाच्या सहा बंडखोर सदस्यांची सुनावणी आता जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणार आहे. अपात्रतेबाबत होत असलेल्या कारवाईवर उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत मोहिते-पाटील गटाच्या सदस्यांची याचिका फेटाळून लावली आहे. 

जिल्हा परिषदेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांनी गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी बंडखोरी केली होती. बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला. बंडखोरी केलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी गट नेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केली होती.

अक्कड़ बक्कड़ बंबे बो, डीजल नब्बे पेट्रोल सौ...उर्मिला मातोंडकर यांची फटकेबाजी

त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सुनावणीही सुरू झाली. या सुनावणीच्या विरोधात बंडखोर सदस्या मंगल वाघमोडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सुनावणीला स्थगिती मिळवली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने वाघमोडे यांची याचिका फेटाळून लावत सदस्य अपात्रतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे होत असलेली चौकशी व कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. 

त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर 10 नोव्हेंबरला या बंडखोर सदस्यांची सुनावणी झाली. आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील केले असून त्याची सुनावणी 16 नोव्हेंबरला आहे. आम्हाला मुदत द्या अशी मागणी बंडखोर सदस्यांनी वकिलांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे केली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर सदस्यांची याचिका फेटाळून लावली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व माळशिरस तालुक्‍याचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी दिली. याचिका फेटाळल्याने राष्ट्रवादीच्यावतीने आज जिल्हा परिषदेसमोर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. 

राष्ट्रवादी झाली आशावादी 

बंडखोर सदस्यांच्या कारवाई बाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. बंडखोर सदस्यांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अपयश आल्याने या प्रकरणात आता ठोस कारवाई होऊ शकते! असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटू लागला आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची राष्ट्रवादीची थोडक्‍यात हुकलेली सत्ता पुन्हा मिळू शकते अशी, आशा राष्ट्रवादीमध्ये निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत मोहिते-पाटील गटाच्या सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितलादेवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले आणि गणेश पाटील या सदस्यांनी राष्ट्रवादीचा व्हिप डावलत मतदान केले होते. त्यामुळे या निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. 

वशाटोत्सवात यंदा शरद पवार, संजय राऊत...

 
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेचा आदेश अद्याप आमच्यापर्यंत आलेला नाही. आदेश पाहून आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असतील तर या प्रकरणाची लवकरच तारीख संबंधितांना कळविली जाईल, असे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.  

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख