निवडणुकीत तुमच्यासाठी रात्रंदिवस पळालो अन्‌ आता निधी देताना टक्केवारी मागता?

त्या कार्यकर्त्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे सर्व पदाधिकारी मूग गिळून गप्प बसले होते. या प्रकाराची तालुक्यात सध्या खमंग चर्चा सुरू आहे.
निवडणुकीत तुमच्यासाठी रात्रंदिवस पळालो अन्‌ आता निधी देताना टक्केवारी मागता?
Percentage demand from office bearers while providing development funds

मंगळवेढा (जि. सोलापूर)  : विकासनिधी देताना पदधिकाऱ्यांकडून टक्केवारीची मागणी होत असल्याने चिडलेल्या कार्यकर्त्याने थेट पंचायत समितीचे सभापती कार्यालय गाठले. तेथे लोकप्रतिनिधींना उद्देशून ‘आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून पळालो, तुम्ही मात्र निवडून आल्यानंतर विकासनिधी देताना टक्केवारी मागता. ठराविक गावाला सर्व निधी देता, आम्ही काय नुसते मोकळे पळायचे का,’ असे म्हणत जाब विचारत त्यांच्या काम करण्याचा पद्धतीचा उद्धार केला. त्या कार्यकर्त्याचा आवेश पाहून उपस्थित पदाधिकारी व काही सरपंच आवक झाले. मात्र कोणीही मध्ये न बोलता शांत राहणे पसंत केले. (Percentage demand from office bearers while providing development funds)

मंगळवेढा तालुक्यात काही जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आपला विकासनिधी वाटप करताना टक्केवारी घेत असल्याचे पुढे आले आहे. जे टक्केवारी देतील, त्यांनाच निधी दिला जात आहे. मात्र, निवडणुकीत ज्यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत करूनही निधी वाटपात डावलले जात असल्याने ग्रामीण भागातील काही कार्यकर्त्यांचा संताप अनावर होत आहेत. मंगळवेढ्यात असा प्रकार नुकताच घडला आहे.

तालुक्यातील एका कार्यकर्त्याचा संताप अनावर झाल्याने त्याने थेट सोलापूर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आदी पदाधिकाऱ्यांना निधी वाटपातील दुजाभावाबाबत जाब विचारला. त्या कार्यकर्त्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे सर्व पदाधिकारी मूग गिळून गप्प बसले होते. या प्रकाराची तालुक्यात सध्या खमंग चर्चा सुरू आहे. 

सरकारने दिलेल्या निधीला अगोदर भ्रष्टाचाराचे ग्रहण होते, आता टक्केवारीचे भूत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. निधी सरकारचा मिजास मात्र लोकप्रतिनिधींची आहे. विकासकामासाठी निधी हवा असेल तर त्यासाठी अधिकारी व पदाधिकारी यांना टक्केवारी मोजावी लागत असल्याची तक्रारदेखील काही जिल्हा परिषद सदस्यांनी यापूर्वी केली आहे. 

मंगळवेढा तालुक्यातील काही जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य हे विकासनिधी वाटपात दुजाभाव करीत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. अधिकाऱ्यांकडून भांडून निधी घ्यायचा व गावागावांतील काही ठेकेदार कम राजकीय कार्यकर्त्यांना टक्केवारी घेऊन निधी देणे, हा त्यांचा धंदा  झाला आहे. वैयक्तीक व सार्वजनिक लाभाच्या योजना देण्यासाठी 10 ते 30 टक्के इतकी रक्कम हे जनसेवक खिशात टाकत असून कामे मात्र निकृष्ट दर्जाची करीत असल्याचे दिसून येत आहे. 

टक्केवारीच्या वाढत्या प्रथेमुळे निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र घुसमट होऊ लागली आहे. संबंधित पदाधिकाऱ्यास निवडणुकीत निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूनही निवडून आल्यानंतर मात्र टक्केवारी घेतली जात आहे. तसेच, निधीवाटपात दुजाभाव होत असल्याने येथील काही कार्यकर्ते या सदस्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराज व्यक्त करीत आहेत. 

सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा निधी येत आहे. मात्र, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीच्या मागणीमुळे विकास कामाच्या दर्जाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.