भाजपच्या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष, तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सहभागी

त्यामुळे महाविकास आघाडीतील आंबेगाव तालुक्यातील दोन नेते नगरपंचायतीला विरोध करत आहेत.
https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-jilha/appointment-dilip-dhotre-mns-leader-vd83-81273
https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-jilha/appointment-dilip-dhotre-mns-leader-vd83-81273

मंचर (जि. आंबेगाव) : “ राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांच्याविरोधात भारतीय जनता पक्ष, असे टोकाचे वातावरण आहे. पण, आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे भाजपच्या आंदोलनाला चक्क शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठींबा दिल्याने तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंचर नगरपंचायत व्हावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. ९ ऑगस्ट) मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण केले. या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेसच्या काही नेत्यांनीही भेट देऊन पाठींबा दिला आहे. (Participation of Shiv Sena, NCP and Congress leaders in BJP's agitation)
   
भाजप नेत्यांनी आंबेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीतील उच्चपदस्थ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या नेत्यांची नावे न घेता त्यांच्यामुळेच नगरपंचायत होत नसल्याची टीकाही केली. अशी पार्श्वभूमी असतानाही भाजपच्या या आंदोलनाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार शरद सोनवणे, तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार यांनी भेट दिली. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, शिवसेनेचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी व्यासपीठावर जाऊन भाषण दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

‘‘नगरपंचायत होणारच, अशी घोषणा महाविकास आघाडीतील आंबेगाव तालुक्याच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी मंचर ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी केली होती. ही फक्त श्रेयवादाची लढाई होती. प्रत्यक्षात मात्र सात महिन्यांचा कालावधी उलटूनही ग्रामस्थ नगरपंचायतीच्या प्रतीक्षेत आहेत. सत्ताधाऱ्यांनी मंचरकरांना झुलत ठेवले. एक महिन्याच्या आत नगरपंचायत करावी; अन्यथा मंचर येथे प्रांत कार्यालयासमोर उपोषण करून आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल,’’ असा इशारा पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात यांनी दिला. 

“मंचरचा नगराध्यक्ष भविष्यात विधानसभा व लोकसभेला प्रतिस्पर्धी ठरू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीतील आंबेगाव तालुक्यातील दोन नेते नगरपंचायतीला विरोध  करत आहेत,” अशी टीका भाजपचे नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी मंचर नगरपंचायत ही काळाची गरज आहे. सामाजिक प्रश्न म्हणून माझा पाठिंबा आहे, असे या वेळी सांगितले. 

“गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंचर नगरपंचायतीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन बाळासाहेब बाणखेले यांनी दिले. मंचर शहरातील एका टोळीचा स्वार्थासाठी नगरपंचायतीला विरोध आहे,”अशी टीका दत्ता गांजाळे यांनी केली. ‘‘आंदोलकांच्या समस्या विचारण्यासाठी गेलो होतो,’’ असे इनामदार यांनी सांगितले.
 
आंदोलनात भाजपचे आंबेगाव तालुकाध्यक्ष अध्यक्ष डॉ. ताराचंद्र कराळे, संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, उपाध्यक्ष विजय पवार, सुशांत उर्फ बाबू थोरात, नवनाथ थोरात, संदीप बाणखेले, गणेश बाणखेले, रोहन खानदेशे, प्रशांत बाणखेले, विजय शिंदे सहभागी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com