पुरात अडकलेल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्यांनी जागून काढली रात्र 

रात्रीचे आकरा वाजलेले...पळशी गावातून फोन येतो... साहेब कासाळ ओढ्याच्या पुराच्या पाण्यात लोखंडे कुटुंब अडकले आहे... काही तरी व्यवस्था करा... त्यांचा जीव वाचवा.
Pandharpur's sub divisional officer woke up all night to save the flood-hit family
Pandharpur's sub divisional officer woke up all night to save the flood-hit family

पंढरपूर : रात्रीचे आकरा वाजलेले...पळशी गावातून फोन येतो... साहेब कासाळ ओढ्याच्या पुराच्या पाण्यात लोखंडे कुटुंब अडकले आहे... काही तरी व्यवस्था करा... त्यांचा जीव वाचवा. हे शब्द ऐकताच कोणताही विचार न करता भरपावसात पळशी गावात जाऊन पुरात अडकलेल्या कुटुंबाना मदत केली जाते.
मदतीनंतर त्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले जाते. पण, त्यासाठी त्यांनी अख्खी रात्र जागून काढली. 

हा थरारक प्रसंग कोणा राजकीय नेता किंवा गावच्या पुढाऱ्याच्या बाबतीत घडला नाही तर पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या बाबीत शुक्रवारी (ता. 18 सप्टेंबर) रात्री घडला. ढोले यांनी अंधाऱ्या रात्रातील पुराचा थरारक अनुभव याची देही, याची डोळा, अनुभवला. 

एक वरिष्ठ अधिकारी म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सात ते आठ जणांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर पडता आले. त्यांच्या या धाडसी आणि साहसी कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

पाण्याच्या प्रवाहापुढे कोणाचेही धाडस होईना 

सांगोला आणि पंढरपूर तालुक्‍यातील अनेक गावांत शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे कासाळ गंगा ओढा दुथडी भरुन वाहत होता. अचानक पावसाचा जोर वाढल्याने ओढ्याच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. बघता.. बघता अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

पळशी येथील तानाजी लोखंडे यांच्या घरालाही पाण्याने वेढा दिला. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. दोघे सख्खे भाऊ, वडील, दोन महिला आणि तीन लहान मुलं अशी सगळी माणसं जीव मुठीत धरुन घराच्या पत्र्यावर जावून बसली होती. चोहोबाजूंनी पाणीच पाणी होते. अंधाऱ्या रात्रीत फक्त त्यांच्यापुढे मरणचं दिसत होते. केवळ देवाचा धावा करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच मार्ग नव्हता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांच्यापर्यंत जाण्याचे धाडसही कोणी दाखवत नव्हते. 

सर्व मार्ग बंद असूनही प्रांताधिकाऱ्यांनी गाठले पळशी 

शुक्रवारी रात्री अकरा वाजता लोखंडे कुटुंब पुरात अडकल्याची माहिती येथील मारुती जाधव यांना मिळताच त्यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना रात्री 11 वाजता फोन करून याबाबत माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ढोले यांनी कोणताही विचार न करता पुरात अडकलेल्या लोखंडे कुटुंबाच्या मदतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु जायचे कसे, पळशी गावाकडे जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. अनेक लहान ओढे दुथडी भरून वाहत होते. परंतु कोणताही विचार न करता, उंबरगाव-सोनके मार्गे त्यांनी पळशी गाव गाठले. गावात पोचण्यासाठी त्यांना रात्रीचे दोन वाजले. 

पहाटे साडेतीनपर्यंत बचाव कार्य सुरू 

तत्काळ त्यांनी पोलिस पाटलाच्या मदतीने काही स्थानिक तरुणांना बोलावून त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अविनाश लोखंडे, दादासाहेब सकट आणि भैय्या लोखंडे यांनी पाण्यात पोहत जावून धनाजी लोखंडे, नाना लोखंडे, तानाजी लोखंडे, बाळासाहेब लोखंडे यांच्यासह दोन महिला आणि तीन लहान मुलांना सुखरुप बाहेर काढले. पहाटे साडेतीनपर्यंत हे बचाव कार्य सुरू होते. सर्व लोकांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर येथील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. 

प्रांताधिकारी ढोले यांनी वेळीच तत्परता दाखविल्यामुळे लोखंडे कुटुंबीयांचे प्राण वाचले; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अंगावरे शहारे आणणारा हा प्रसंग सांगताना ढोलेही भावुक झाले होते. 

 पळशीतील लोखंडे कुटुंबावर मोठे संकट आले होते. शुक्रवारी मध्यरात्री तीनपर्यंत बचाव कार्य सुरू होते. यामध्ये तेथील स्थानिक तरुणांनी मोठी मदत केली. त्यांच्या या मदतीमुळेच त्यांना वाचवण्यात यश आले. 

-सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर 

संकट काळात कोणताही विचार न करता, स्वतःचा जीव धोक्‍यात घालून आमच्यासाठी ढोले साहेब देवदूताप्रमाणे धावून आले. 
-धनाजी लोखंडे, पुरातून वाचलेले पळशीचे ग्रामस्थ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com