पवारांच्या केंद्रस्थानी पुन्हा पंढरपूर : महिनाभरात साहेबांसह दादांचा दौरा  - Pandharpur again at Pawar's center: Dada's tour with Saheb within a month | Politics Marathi News - Sarkarnama

पवारांच्या केंद्रस्थानी पुन्हा पंढरपूर : महिनाभरात साहेबांसह दादांचा दौरा 

भारत नागणे 
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

पवारांनी पंढरपूरकरांशी असलेली आपली राजकीय नाळ तुटू न देता ती अधिक घट्ट केली आहे. 

पंढरपूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.17 ऑक्‍टोबर) पंढरपुरात येऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर रविवारी (ता. 18) जामखेडचे आमदार रोहित पवारांनीही येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेत एक ट्रकभर जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले.

अलीकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही पंढरपूरचा दौरा केला होता. एकाच महिन्यात थोरल्या आणि थाकल्या पवारांच्या दौऱ्यानंतर आता पंढरपूर पवारांच्या केंद्रस्थानी आल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सोलापूर जिल्हा आणि शरद पवार यांचे नातं नेहमीच घट्ट राहिलं आहे. शरद पवारांना नेहमीच पंढरपूर तालुक्‍यातील राजकीय नेत्यांनी खंबीर साथ दिली आहे. (कै.) औदुंबरअण्णा पाटील, (कै.) सुधाकर परिचारक, (कै.) यशवंतभाऊ पाटील यांनी पवारांना सावलीसारखी साथ देऊन राज्याच्या राजकारणात नेहमीच पाठिंबा दिला होता. 

या मातब्बर नेत्यांच्या निधनानंतरही पवारांनी पंढरपूरकरांशी असलेली आपली राजकीय नाळ तुटू न देता ती अधिक घट्ट केली आहे. 

अलीकडेच पवारांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सुधाकर परिचारक, राजूबापू पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवारांनी परिचारक आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वनदेखील केले होते. 

शरद पवारांच्या दौऱ्यानंतर शनिवारी (ता. 17) उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही महापूर पाहणीच्या निमित्ताने पंढरपूरचा दौरा केला. या दौऱ्यात अजित पवारांनी (कै.) राजुबापू पाटील आणि (कै.) सुधाकर परिचारक यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. 

या वेळी अजित पवारांनी आमदार प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांच्याशी साखर उद्योगातील अनेक विषयांवर चर्चा केली. शिवाय कौटुंबिक विषयावर देखील चर्चा केली. यातूनच पवार आणि परिचारक यांचे संबंध अजूनही घट्ट असल्याचे अधोरेखीत झाले आहे. 

अजित पवारांच्या दौऱ्यानंतर रविवारी (ता. 18) जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी येथील 1 हजार पूरग्रस्तांसाठी जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. अलीकडच्या काही दिवसांमध्ये शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांनी पंढरपूकरांसाठी जी तत्परता दाखवली आहे. त्या विषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

एवढेच नाही तर अजित पवारांनी पंढरपूरच्या विकास कामातदेखील लक्ष घातले आहे. एक हजार कोटींची कामे होऊनदेखील शहराचा विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी पंढरपूरच्या विकास कामासंदर्भात पुण्यात आढावा बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पवार कुटुंबीयांच्या वाढत्या दौऱ्यामुळे पंढरपूर हे पुन्हा केंद्रस्थानी आले आहे. पवारांच्या मनात चाललंय तरी काय? अशी चर्चा सध्या पंढरपूरकरांमध्ये सुरू आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख