पुणे पदवीधर मतदारसंघातून नीता ढमालेंचा जिंकण्याचा निर्धार 

महिलांना राजकीय आरक्षण दिले पाहिजे, अशी नुसतीच चर्चा राजकीय पक्ष करीत असतात. प्रत्यक्षात उमेदवारी देताना याचा त्यांना विसर पडतो.
पुणे पदवीधर मतदारसंघातून नीता ढमालेंचा जिंकण्याचा निर्धार 
Nita Dhamale decides to win from Pune graduate constituency

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नीता ढमाले यांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बुधवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ढमाले बोलत होत्या. 

ढमाले म्हणाल्या, "पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही राजकीय पक्षांना बळकटी देण्यासाठी नसून पदवीधरांच्या कल्याणासाठी आहे. म्हणूनच मी पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. महिलांना राजकीय आरक्षण दिले पाहिजे, अशी नुसतीच चर्चा राजकीय पक्ष करीत असतात. प्रत्यक्षात उमेदवारी देताना याचा त्यांना विसर पडतो. गेल्या एक वर्षापासून पदवीधर निवडणुकीसाठी तयारी करीत आहे. निस्वार्थीपणे पक्षात काम केले. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली. पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी मी एक सक्षम महिला पर्याय म्हणून निवडणुकीत विजयाचा निर्धार करून उतरले आहे.' 

ढमाले म्हणाल्या, "राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सरकारी योजना प्रभावी पद्धतीने राबविल्या, तर यावर उपाय ठरू शकतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता बदलेली आहे. आरक्षणाच्या कचाट्यात परीक्षा अडकलेल्या आहेत. महापोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मोठा घोटाळा झाला असून त्याची चौकशी होण्याची गरज आहे. तीन वर्षांपासून पोलिस भरती करू, असे पोकळ आश्वासन दिले जात आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हातात काय मिळते, हा मोठा प्रश्न आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये कंत्राटीकरण सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.' 

पुणे विभागात सर्वच जिल्ह्यात गेल्या एक वर्षापासून प्रभावी काम सुरू आहे. प्रचाराचे योग्य नियोजन सुरू असून, सर्व मतदारांपर्यत पोचण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. पदवीधरांचा विश्वास संपादन केलाच आहे. पाचही जिल्ह्यातील पदवीधर मतदारांकडून खूपच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याने जिंकून येण्याचा विश्‍वास आहे. मतदारांशी नियमित संवाद सुरू असून, त्यांच्या अडीचणी समजून घेत आहे, असे ढमाले यांनी सांगितले. या वेळी त्यांनी निवडणुकीतील प्रचाराच्या नियोजनाबाबत माहिती दिली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in