पंढरपुरातील त्या वक्तव्यानंतर नाथाभाऊंच्या राजकीय कारकिर्दीस उतरती कळा 

त्या वक्तव्यानंतर वर्षभरात त्यांना मंत्रिपद, तर सहा वर्षांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश करावा लागला.
Nathabhau's political career took a turn for the worse after that statement in Pandharpur
Nathabhau's political career took a turn for the worse after that statement in Pandharpur

पंढरपूर : भारतीय जनता पक्षाच्या वाढीपासून राज्यात सत्तेचा सोपान चढेपर्यंत सलग 40 वर्षे कष्ट उपसणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या महापुजेवेळी केलेले राजकीय वक्तव्य त्यांना भोवले.

त्यांच्या त्या वक्तव्यानंतर वर्षभरात त्यांना मंत्रिपद, तर सहा वर्षांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश करावा लागला. खडसे यांनी त्यावेळी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली नसती तर कदाचित ते आज पक्षात कायम राहिले असते. अशी चर्चा राजकीय अंगाने व्यक्त केली जात आहे. 

राज्यात 2014 च्या निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. ज्येष्ठ म्हणून आपणास मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. तेव्हाच खडसे काहीसे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे महसूल, कृषी, उत्पादन शुल्क अशी महत्वाची सहा ते सात खाती देण्यात आली होती. 

महसूलमंत्री पद असल्याने एकनाथ खडसेंना प्रथमच पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीची विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा करण्याची संधी मिळाली होती. खडसे कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपुरात आले होते.

त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना बहुजनाचा मुख्यमंत्री झाला असता तर मला आनंद झाला असता, असे सूचक वक्तव्य करुन मुख्यमंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यावेळी भाजपत मोठी खळबळ उडाली होती. 

त्यांच्या याच वक्तव्यावरून मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीसही नाराज झाले होते. परंतु त्यांनी कधीही त्यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली नव्हती. त्यानंतरच फडणवीस आणि खडसे यांच्यातील राजकीय दरी वाढत गेली. साधारण एका वर्षातच एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप झाले. आरोपानंतरच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

त्यांचे ते वक्तव्यच त्यांना शेवटपर्यंत अडचणीचे ठरले. सर्व आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यांतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील खडसेंना डावलण्यात आले. खडसेंनी अनेकदा फडणवीस यांच्याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. 

शेवटी पक्ष सोडताना खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवूनच भाजपला रामराम केला. गेल्या सहा वर्षांच्या काळात फडणवीस आणि खडसे यांच्यातील राजकीय संघर्षाला आज त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेने पूर्णविराम मिळाला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com