खुद्द अजितदादाही या कामात चूक काढू शकणार नाहीत  - MP Amol Kolhe, Mla Ashok Pawar visited the new administrative building of Shirur Municipal Council | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

खुद्द अजितदादाही या कामात चूक काढू शकणार नाहीत 

नितीन बारवकर
मंगळवार, 29 जून 2021

इमारतीची रचना, इमारतीतील अद्ययावत सुविधा, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित कामकाजाची माहिती दिली. 

शिरूर (जि. पुणे) : शिरूर नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार ऍड. अशोक पवार यांनी  या कामाचे कौतुक केले. तसेच, नगर परिषदेचे हे नवीन कार्यालय आतून-बाहेरून नियोजनबद्ध आहे. ही भव्य इमारत भविष्यात शिरूर शहराच्या वैभवात उचित भर घालणारी ठरेल' असे गौरवोद्‌गार खासदार डॉ. कोल्हे यांनी या वेळी काढले. (MP Amol Kolhe, Mla Ashok Pawar visited the new administrative building of Shirur Municipal Council)

दरम्यान, ‘‘मोठ्या अनुभवामुळे बांधकामाचा दर्जा, त्यातील खाचाखोचा यांची पुरेशी जाण असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शिरूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील कामाबाबत चूक काढू शकणार नाहीत,’’ असा दावा आमदार ऍड. अशोक पवार यांनी या पाहणीवेळी केला. 

हेही वाचा : बांदलांना मदत करणे वाफगावच्या माजी सरपंचाच्या आले अंगलट

काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिस आयुक्तालयाच्या नूतनीकरणाची उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी तेथील कामाचा दर्जाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तसेच, मी चांगल्या चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा आहे, असे सांगून त्यांनी अधिकारी आणि ठेकेदाराला चांगलेच सुनावले हेाते. त्या पार्श्वभूमीवर आमदार अशोक पवारांचा शिरूरमधील नूतन प्रशासकीय इमारतीची दावा महत्त्वाचा मानला जात आहे. 

पुणे- नगर रस्त्यालगत नवीन जागेत नगरपरिषदेची तीन मजली दिमाखदार कार्यालयीन इमारत उभी राहत आहे. संपूर्ण संगणीकृत, अग्निरोधक व सर्व सुविधांयुक्त या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

दरम्यान, खासदार डॉ. कोल्हे यांनी आमदार ऍड. पवार यांच्यासह शिरूर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्यानंतर या कामाच्या ठिकाणी भेट दिली. नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी त्यांचे स्वागत केले. नवीन इमारत उभारणीच्या कामाचे संपूर्ण नियोजन करणारे नगरसेवक विजय दुगड यांनी इमारतीची रचना, इमारतीतील अद्ययावत सुविधा, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित कामकाजाची माहिती दिली. 

नगर परिषदेची ही देखणी, भव्य इमारत शिरूरकरांची शान ठरेल, असा आशावाद खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘सर्वसाधारण शासकीय इमारती बाहेरून चांगल्या दिसतात. पण आतमध्ये काहीतरी गडबड झालेली दिसते. या इमारतीत मात्र बारीक-सारीक बाबींवर अचूक लक्ष ठेवून नियोजन केलेले आहे. सूर्यप्रकाश व खेळती हवा हे या इमारतीचे वैशिष्ट्य ठरेल.''

विठ्ठल पवार, मंगेश खांडरे, सचिन धाडिवाल, सुरेखा शितोळे, रोहिणी बनकर, संगीता मल्लाव, मनिषा कालेवार, रेश्‍मा लोखंडे व ज्योती लोखंडे हे नगरसेवक या वेळी उपस्थित होते. नवीन इमारतीचे काम करीत असलेले बांधकाम व्यावसायिक सुभाष गांधी यांनी आभार मानले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख