आमदार सातपुतेंनी मिळवून दिले 20 वर्षांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठाला रेशन  - MLA Ram Satpute gets rations to senior citizens who have been deprived for 20 years | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सातपुतेंनी मिळवून दिले 20 वर्षांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठाला रेशन 

संपत मोरे 
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

आमदार साहेब मला गेल्या वीस वर्षांपासून रेशन भेटत नाही. तहसीलमध्ये हेलपाटे मारले, तरी पण रेशन भेटत नाही. आम्ही गरिबांनी काय करायच..?'

पुणे : "साहेब गेल्या वीस वर्षांपासून मला रेशनचे धान्य मिळत नाही. तहसीलदार कचेरीत मी खूप चकरा मारल्या. पण, माझी कोणीही दाद घेत नाही,' अशी कैफियत मगराचे निमगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रामू गणपत बोडरे यांनी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याकडे मांडली. 

भारतीय जनता पक्षाचे आमदार सातपुते बोडरे यांना घेऊन पुरवठा अधिकाऱ्यांकडे गेले. त्यांनी बोडरे यांना तत्काळ धान्य देण्याच्या सूचना दिल्या आणि वीस वर्षे तहसील कचेरीत चकरा मारणाऱ्या रामू बोडरे यांना अखेर रेशनिंगचे धान्य मिळाले. आमदार सातपुते यांनी आपल्या फेसबुकवर याबाबतची पोस्ट केली आहे. 

"तहसील कार्यालयातून शुक्रवारी (ता. 4 सप्टेंबर) दुपारी मी कृषी विभागाची बैठक संपवून बाहेर पडत असताना एक वृद्ध आजोबा पायऱ्या जवळ उभे होते. संकोच करत माझ्या जवळ आले आणि म्हणाले, आमदार साहेब मला गेल्या वीस वर्षांपासून रेशन भेटत नाही. तहसीलमध्ये हेलपाटे मारले, तरी पण रेशन भेटत नाही. आम्ही गरिबांनी काय करायच..?' असा प्रश्न त्यांनी मला केला. 

या वेळी मी स्वतः त्यांना आतमध्ये तहसील कार्यालयात पुरवठा विभागात सोबत घेऊन गेलो. पुरवठा अधिकाऱ्यांना सक्त सूचना केली आजपासून रामू बोडरे या बाबांना रेशनिंगचे धान्य द्यायला सुरुवात करा. धान्य मिळाल्याचे बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद मला मोठे समाधान देऊन गेला. 

राम आमदार सातपुते म्हणाले, "मला त्या बाबांनी येऊन त्यांची अडचण सांगितली. एका गरीब व्यक्तीला एवढी वर्षे धान्य मिळत नाही, याचे दुःख वाटले.' 

रामू बोडरे म्हणाले,"मला रेशनचे धान्य मिळावे; म्हणून मी अनेकवेळा हेलपाटे घातले. मी गरीब माणूस आहे. वीस वर्षे मला धान्य मिळत नव्हतं. माझं कोणीही ऐकत नव्हतं. आमदार सातपुते यांनी माझं म्हणणं ऐकलं. त्यांच्यामुळे मला धान्य सुरू झालं.' 

हेही वाचा : "कंगना तो एक बहाना है...बेबी पेंग्विन को बचाना है' 

मुंबई : "सावधान...! सावधान...! कंगना तो एक बहाना है...एसएसआर और दिशा केस से ध्यान हटाना है...बेबी पेंग्विन को बचाना है... बाकी कुछ नही !!' अशा प्रकारचे सूचक ट्विट करत भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. 

मुंबई ही पाकव्याप्त काश्‍मीरसारखी वाटत असल्याचे विधान अभिनेत्री कंगना रनौट हिने केले होते. त्यावरून तिच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. राजकीय क्षेत्रासह सिनेसृष्टी आणि सर्वसामान्यांकडूनही कंगनाच्या विधानाचा समाचार घेतला जात होता. आज (ता. 5 सप्टेंबर) मात्र आमदार नीतेश राणे यांनी आपला शिवसेना विरोध कायम ठेवत वेगळाच मुद्दा पुढे आणला आहे. 

ट्विटमध्ये राणे यांनी म्हटले आहे की, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा हिच्या मृत्यूच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी कंगनाचे वक्तव्य आणि त्यावर गदारोळ उठविला जात आहे.

"कंगना हे निमित्त असून सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यू प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे, यात बाकी काही नाही,' असा हल्लाबोल त्यांनी शिवसेनेवर केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख