पडळकरांवर गुन्हा दाखल करणारे पोलिस प्रणिती शिंदेंवर कारवाईचे धाडस दाखवणार का? - MLA Praniti Shinde attended the public function Despite the curfew | Politics Marathi News - Sarkarnama

पडळकरांवर गुन्हा दाखल करणारे पोलिस प्रणिती शिंदेंवर कारवाईचे धाडस दाखवणार का?

विश्वभूषण लिमये
शनिवार, 3 जुलै 2021

एमआयएमला मत म्हणजेच भाजपला मत.

सोलापूर  ः कोरोनाच्या नव्या शासकीय नियमांमुळे सोलापूर शहरात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी आहे. मात्र, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सोलापूर महापालिकेच्या नगरसेविका अनुराधा काटकर यांच्या प्रभागात जाहीर रात्री कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश नागरिकांच्या तोंडावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे पोलिस आता आमदार प्रणिती शिंदे आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (MLA Praniti Shinde attended the public function Despite the curfew)

दरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन करून घोंगडी बैठका घेतल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवतील काय, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

हेही वाचा : बांदलांना नियमबाह्य कर्ज देणे भोवले; भोसले बॅंकेचे तीन मॅनेजर गजाआड

या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. ‘‘कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन असताना नरेंद्र मोदी सरकारने ज्या पद्धतीने काम करणे अपेक्षित होते, त्याप्रमाणे ते झाले नाही. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांचा मुबलक पुरवठा करण्यात केंद्र सरकार कमी पडलं; म्हणून देशात मृत्यूचे प्रमाण वाढले. तरीसुद्धा काही लोक भारतीय जनता पक्षाला मत देतात. काही नागरिक भाजपला मत देत नसतील तर ते एमआयएमला मत देतात. मात्र, एमआयएमला मत म्हणजेच भाजपला मत,’’ असा आरोप काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. 

नगरसेविका अनुराधा काटकर यांच्या प्रभागात शुक्रवारी (ता. २ जुलै) रात्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिंदे त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, जेव्हा काँग्रेस पक्षाची सत्ता होती, तेव्हा एमआयएम हा पक्ष कुठेही नव्हता. परंतु जेव्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तेव्हा एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष पुढे आले आहेत. भारतीय जनता पक्षाने नियोजनबद्ध पद्धतीने जाती जातींमध्ये फूट पाडण्यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला पुढे आणले आहे, असा दावा आमदार शिंदे यांनी केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख