प्रकाश आंबेडकरांपेक्षा रामदास आठवले अधिक जवळचे वाटतात - Maratha reservation issue seems closer to Athavale than Ambedkar : Narendra Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

प्रकाश आंबेडकरांपेक्षा रामदास आठवले अधिक जवळचे वाटतात

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

केंद्राची भूमिका स्पष्ट झाल्यास मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्याकडून सुरू असलेली टोलवाटोलवी दूर होण्यास मदत होणार आहे.

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या चळवळीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मराठा समाजाला जवळचे वाटतात, असे आपले प्रामाणिक मत असल्याचे मराठा आक्रोश मोर्चाचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले. (Maratha reservation issue seems closer to Athavale than Ambedkar : Narendra Patil)

पाटील यांनी सोलापुरात शुक्रवारी (ता. 2 जुलै) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली. मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले यांच्या तुलनेत कोण जवळचे वाटतात, या प्रश्नावर पाटील यांनी आठवले यांचे नाव घेणे पसंत केले. कोपर्डी घटनेनंतर व मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतरदेखील आठवले हे आमच्यासोबत कायम राहिले, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा : खवतोडेंना संधी देऊन राष्ट्रवादीने सुरू केली नगरपालिका निवडणुकीची तयारी

केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांची आम्ही मराठा आरक्षणप्रश्‍नी लवकरच भेट घेणार आहोत. केंद्र सरकारने 102 व्या घटना दुरुस्तीबाबत संसदेत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी आम्ही करणार आहोत. केंद्राची भूमिका स्पष्ट झाल्यास मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्याकडून सुरू असलेली टोलवाटोलवी दूर होण्यास मदत होणार आहे, असेही पाटील म्हणाले.

नवीन मागासवर्गीय आयोग नेमण्याची गरज

मराठा आरक्षणप्रश्‍नी राज्य सरकारने नेमलेला गायकवाड आयोग बरखास्त झाला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने नवीन मागासवर्गीय आयोग नेमून सर्व्हे करावा. अन्य राज्यांनी अतिरिक्त वा वाढीव आरक्षणाबाबत केंद्राकडे परवानगी घेतली म्हणून त्यांच्या राज्यातील आरक्षण अबाधित आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील अशी परवानगी घेतल्यास आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

संभाजीराजेंनी सरकारचे केलेले कौतुक पटले नाही

मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात संभाजीराजे आपल्या पाठिशी का नाहीत, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता, श्री. पाटील म्हणाले, पूर्वी आंदोलनाबाबतच्या प्रक्रियेत ते सामील होते. पण आता आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारचे केलेले कौतुक मला पटले नाही. आरक्षण मिळावे व यासंदर्भातील सर्व योजनांची अंमलबजावणी व्हावी, अशी आमची आग्रही मागणी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पवारांच्या भूमिकेविषयी संभ्रमावस्था 

मराठा आरक्षणाप्रश्नी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 9 सप्टेंबर व 5 मेनंतर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रमावस्था आहे. शरद पवारांचा उल्लेख दी ग्रेट मराठा असा केला जातो. हे लक्षात घेता मराठा आरक्षणाबाबतचा खुलासा खुद्द शरद पवारांनीच करावा, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख