पंढरपुरातील मराठा आंदोलन पोलिसांनी मोडून काढले  - Maratha agitation in Pandharpur was crushed by the police | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

पंढरपुरातील मराठा आंदोलन पोलिसांनी मोडून काढले 

भारत नागणे 
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

इंदापूर भागातून आलेले कार्यकर्ते पायी निघाले असता, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

पंढरपूर : विविध मराठा संघाटनांनी एकत्रित येत काढलेला पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी मोर्चा आज पोलिस प्रशासनाने मोडून काढला. त्यानंतर प्रमुख आंदोलकांची खासगी गाड्यातून पुण्याकडे रवानगी केली. पायी दिंडी मोर्चा रद्द झाल्यानंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाच्या या दडपशाहीचा निषेध करत इंदापूर भागातून आलेले कार्यकर्ते पायी निघाले असता, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 7 नोव्हेंबर) दिवसभर पंढरपुरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान विविध मागण्यासंदर्भात पुणे येथे मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा या प्रमुख संघटनांनी मागील आठ दिवसांपूर्वी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी मोर्चाची हाक दिली होती. 

दोन दिवसांपासून मोर्चाची तयारी सुरू होती. दरम्यान, आज राज्यभरातून मराठा बांधव पंढरपुरात दाखल होण्यासाठी आले असता, पोलिसांनी या कार्यकर्त्यांची नाकाबंदी केली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना पंढरपुरात येता आले नाही. 

दरम्यान, काही आंदोलक आज सकाळपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमा झाले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. 6 नोव्हेंबर) रात्री 12 पासूनच मंदिर परिसरासह इतर भागात संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरात व विठ्ठल मंदिर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. 

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुमारे 450 हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचा तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि उपअधीक्षक अतुल झेंडे सकाळपासूनच शहरात ठाण मांडून होते. 

चर्चेनंतर सकाळी 11 वाजता दहा कार्यकर्त्यांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर नामदेव पायरीचे दर्शन घेतल्यानंतर मोर्चा स्टेशन रोड मार्गे नवीन एसटी बसस्थानकासमोर आला असता, पुणे विभागात आचारसंहिता असल्याने लॉग मार्च काढता येणार नसल्याचे कारण सांगत पोलिसांनी मोर्चाला रोखले. 

मार्चा रोखल्याने पोलिस आणि मराठा समनव्यकांमध्ये काहीवेळ तणाव निर्माण झाला. पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी सामजंस्याची भूमिका घेत आंदोलकांची समजूत काढली. शेवटी चर्चेनंतर खासगी दहा गाड्यांमधून पुण्यापर्यंत जाण्याचा निर्णय झाला. त्यानुसार प्रमुख कार्यकर्ते दुपारी पोलिस बंदोबस्तामध्ये पुण्याच्या दिशेने रवाना झाले. 

पोलिसांनी जाणून बुजून मराठ्यांचा मोर्चा हाणून पाडल्याचा आरोप करत, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मंत्रालयावर धडक मारणारच, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे व धनंजय साखळकर यांनी दिला. 

दरम्यान, इंदापूर भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाचे हे आंदोलन पोलिसांनी मोडून काढल्याचा आक्षेप घेत पायी चालत निघाले. या कार्यकर्त्यांना येथील केबीपी कॉलेज जवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख