many bjp workers and supporters of MP Sanjay patil join NCP | Sarkarnama

खासदार संजय पाटलांच्या `होमपीच`वर भाजपला गळती; राष्ट्रवादीत प्रवेश

संपत मोरे
शुक्रवार, 12 जून 2020

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ग्रामीण भागातील समीकरणे बदलू लागली आहेत. 

पुणे : सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या होमपीचवर तासगाव तालुक्यात  भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तासगाव तालुक्यातील मणेराजुरीसारख्या महत्त्वाच्या गावात खासदार पाटील यांच्या गटातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. माजी उपमुख्यमंत्री आर आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये गेले होते. पण त्यांचा फारसा परिणाम जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत जाणवला नाही. उलट आर. आर. पाटील यांचा गट दिवसेंदिवस बळकट होत गेला. आता भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत यायला लागल्याने नेमकं काय घडलं आणि बिघडलं याची चर्चा सुरू आहे.

मणेराजूरी गावातील बाळासो पवार, वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक  शिवाजी पाटील, ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मणेराजूरी गावातील या प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच सावळज येथील ग्रामपंचायतीत खासदार गटाच्या नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी आपले राजीनामे सरपंच योगेश पाटील यांच्याकडे  दिले.

ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आकाराम शिंदे, हेमंत उर्फ अरुण सखाराम पाटील, काशीनाथ रामचंद्र भडके, अमित कांबळे, अभिजीत थोरात, शहाजी तुकाराम बुधवले, व सदस्या. किरण बाळासाहेब थोरात, पमाताई भिसे, वैशाली सुनील कांबळे यांनी  राजीनामे दिलेले आहेत. मणेराजूरीत अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले असतानाच सावळज येथील सदस्यांनी राजीनामे दिल्याने त्यांची आगामी भूमिका काय असेल याचीही चर्चा सुरू आहे.

"आर. आर. आबांनी विकासकामे करताना पक्ष पार्टी बघितली नव्हती. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून  मी करत आहे. काम घेऊन येणारा माणूस कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार कधीच केला नाही. त्यामुळे मतदारसंघातील जनता ठामपणे पाठिशी उभी आहे. आमच्याकडे आलेल्या  गटाला निश्चित न्याय देऊ. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. कोणत्याही संकटात त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू,``असे राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख