मंगलदास बांदल यांची पत्नी व भावाचा जामीन अर्ज फेटाळला - Mangaldas Bandal's wife and brother's bail application rejected | Politics Marathi News - Sarkarnama

मंगलदास बांदल यांची पत्नी व भावाचा जामीन अर्ज फेटाळला

भरत पचंगे
सोमवार, 19 जुलै 2021

तुम्ही विरोध केल्यास तुम्हा बाप-लेकांच्या अंगावरून ट्रॅक्टर घालू व जीवे मारु.

शिक्रापूर (जि. पुणे) : पाणीचोरीच्या गुन्ह्यात महिनाभरापूर्वी माजी सभापती मंगलदास बांदल आणि त्यांचे भाऊ बापूसाहेब बांदल यांना दिलेला अंतरिम जामीन पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आज (ता. १९ जुलै) रद्द केला. याबाबतची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. दुसऱ्या गुन्ह्यात अटक असलेले मंगलदास बांदल यांच्याबरोबरच आता त्यांचे भाऊ बापूसाहेब यांना कधीही अटक होऊ शकते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. (Mangaldas Bandal's wife and brother's bail application rejected)   

शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे राहणारे निवृत्त पोलिस अधिकारी ज्ञानदेव गुलाबराव तनपुरे यांचे दोन एकर शेतजमीन आहे. या शेतात त्यांच्या मालकीची एक विहीर असून त्या विहिरीतील पाणी बांदल आणि त्यांचे बंधू बापूसाहेब बांदल हे तारेचे कंपाऊंड तोडून त्यांच्या हस्तकांकरवी टँकरद्वारे (एमएच 04;डीडी4846) गेली अनेक दिवसांपासून पाणी चोरून नेत होते.

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या नव्या महिला जिल्हाध्यक्षाची आठवडाभरात होणार घोषणा 

या प्रकाराचा जाब फिर्यादी ज्ञानदेव तनपुरे यांचा मुलगा कैलास याने विचारला असता, ‘आमचे दररोज ६ टॅंकर इथे येत राहतील. तुमच्यात हिंमत असेल तर आडवून दाखवा. तुम्ही विरोध केल्यास तुम्हा बाप-लेकांच्या अंगावरून ट्रॅक्टर घालू व जीवे मारु,’ अशी धमकी बांदल यांच्याकडू तनपुरे यांच्या मुलाला देण्यात आली होती. तनपूरे यांच्या फिर्यादीवरून बांदल व त्यांचे भाऊ बापूसाहेब बांदल यांच्यावर खंडणी, पाणीचोरी, जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा १८ मे रोजी दाखल झाला होता. 

या पाणीचोरीच्या गुन्ह्यात पुणे सत्र न्यायालयाने बांदल यांना अंतरीम जामीन दिला होता. हे जामिनाचे न्यायालयाचे आदेशपत्र शिक्रापूर पोलिसांना सादर करण्यासाठी मंगलदास बांदल हे २६ जून रोजी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गेले हेाते. त्यावेळी दत्तात्रेय मांढरे यांच्या फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात बांदलांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन गुन्हे बांदल यांच्यावर दाखल होऊन त्यांना सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यांचे भाऊ बापूसाहेब बांदल यांना अटक होणे बाकी होते. 

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने पाणीचोरीप्रकरणी दिलेला बांदल व त्यांच्या भावाचा अंतरिम जामीन रद्द केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. त्यामुळे बापूसाहेब बांदल यांना येत्या काळात कधीही अटक होऊ शकते, अशी माहिती दिली. दरम्यान, मांढरे यांच्या प्रकरणात बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल यांचाही जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख